
चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे : कौटुंबिक वादातून नातवाचा खून घडवून आणणार्या कुख्यात बंडू आंदेकर याच्यासह १३ जणांच्या टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यासोबतच आंदेकरच्या अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून महानगरपालिकेसोबत पत्रव्यवहार केला आहे. त्याद्वारे टोळीचा आर्थिंक कणा मोडण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, गुन्ह्यात मदत करणार्या प्रत्येकाविरूद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
यश सिद्धेश्वर पाटील वय १९, अमित प्रकाश पाटोळे वय १९, अमन युसूफ पठाण उर्फ खान वय २५ , सुजल राहूल मेरगु वय १९, सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर वय ७०, स्वराज निलंजय वाडेकर, तुषार निलंजय वाडेकर, वृंदावनी निलंजय वाडेकर यांच्यासह आणखी पाचजणांविरद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. टोळीने ५ सप्टेंबरला नाना पेठेत आयुष उर्फ गोविंद कोमकर (वय १९, रा. नाना पेठ ) याचा खून केला होता.
कुख्यात बंडू आंदेकर टोळीविरूद्ध विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुलगा वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या आपल्याच नातवावर गोळीबार करून खून घडवून आणला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत ८ जणांना अटक केली असून, पसार झालेल्या पाचजणांना शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, टोळीविरूद्ध मोक्का कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. त्यानुसार याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी कारवाईचा प्रस्ताव तयार केला. उपायुक्त कृषीकेश रावले यांच्यावतीने अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांना सादर केला. त्यानुसार टोळीविरूद्ध मोक्का कारवाई केली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
आंदेकरच्या अनधिकृत बांधकामांचा उठणार बाजार
कुख्यात आंदेकरने दहशतीच्या जोरावर ठिकठिकाणी बेकायदेशिरपणे बांधकामे केल्याचा संशय आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून पुणे महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार अनधिकृत बांधकामावर लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. टोळीचा मुख्य आर्थिंक कणा मोडून त्यांच्यावर जरब बसविण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासोबतच खूनाच्या गुन्ह्यात छोटा सहभाग असणार्यांनाही सोडणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आंदेकरचा ट्रॅव्हलचा प्रवास अन पोलिसांकडून पाठलाग
नातवाच्या खूनाचा कट केल्यानंतर आरोपी बंडू आंदेकर कुटूंबियासह ट्रॅव्हल्सने देवदर्शन करीत होता. खासगी गाडीतून प्रवास केल्यास पोलिसांच्या जाळ्यात सापडू शकतो, असा अंदाज त्याने बांधला होता. मात्र, खंडणी विरोधी पथक दोनचे एपीआय नितीन नाईक, उपनिरीक्षक गौरव देव, संतोष विभुते, सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, पवन भोसले, दीनेश बोस्टेवार्ड, गीतांजली जांभुळकर यांच्या पथकाने आंदेकरच्या हालचालींची इत्भूंत माहिती मिळविली. बुलढाण्याच्या दिशेने धावणार्या ट्रॅव्हलचा माग काढत पाठलाग केला. अखेर बुलढाण्यात ट्रॅव्हलला अडवून आंदेकर टोळीच्या मुसक्या आवळल्या.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.