
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: मुंबई महानगरपालिकेबरोबरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं असून केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याचं राजकीय क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे. असं असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत येण्याची इच्छा आहे असं विधान संजय राऊतांनी केलं आहे. एकीकडे राज यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून सोबत घ्यायचं की वेगळी चूल मांडायची यावरुन ठाकरेंकडून चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी आमच्या पारड्यातच मुंबईकर मत टाकतील असा विश्वास मुंबई भाजपाने व्यक्त केला आहे.
‘बेस्ट’ पतपेढीची निवडणूक हा ट्रेलर होता
राज आणि उद्धव जूननंतर सातव्यांदा रविवारी एकमेकांना भेटले. राज ठाकरे सहकुटुंब स्नेहभोजनासाठी उद्धव यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहोचले होते. यावरुनच भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या एक्स अकाऊटवरुन पोस्ट करत ठाकरे बंधूंना टोला लगावला आहे. “उध्दव आणि राज ठाकरे युती चमत्कार घडवित मुंबईत जिंकेल अशी अजूनही काही जणांना फारच आशा वाटते. ‘बेस्ट’ पतपेढीची निवडणूक हा ट्रेलर होता. तिथेच दणकून आपटल्यानंतरही मुख्य चित्रपट आलाच, तर पहिल्याच ‘शो’ला गाशा गुंडाळावा लागेल याबद्दल मुंबईकरांना खात्री आहे,” असं उपाध्ये म्हणालेत.
मुंबईकर कुणाला निवडतील?
“मुंबईकर कुणाला निवडतील?” असं म्हणत उपाध्येंनी पाच मुद्दे मांडलेत. त्यांनी मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे:
> मेट्रोचे जाळे विणत मुंबईकरांना सुखकर प्रवास देणाऱ्या देवाभाऊना, की वर्षानुवर्षे मुंबई महापालिकेवर अजगराप्रमाणे वेटोळे टाकून बसूनही मुंबईची दरवर्षी तुंबई करत लाखो प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या उबाठाला??
> मुंबईच्या पायाभूत सुविधा वाढवित मुंबईचा चेहरामोहरा बदलून जगाच्या पाठीवर एक उत्तम शहर म्हणून नावलौकिकास आणणाऱ्या देवाभाऊना, की विकासाचे प्रकल्प बंद पाडून मुंबईकरांच्या हालअपेष्टांत वाढ करणाऱ्या उबाठाला??
> बीडीडी चाळीतील मराठी माणसांना घर देणाऱ्या देवाभाऊंना, की पत्रा चाळीतील मराठी माणसांची घरं लाटत मराठी माणसाला देशोधडीला लावणाऱ्या संजय राऊताच्या उबाठाला??
> मराठी माणसाचा अभिमान असणाऱ्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणाऱ्या देवाभाऊंना, की मराठी माणसांचे नाव घेत कंत्राट देताना अमराठी, कविता म्हणायला जावेद अख्तर सारख्या अमराठीना पाचारण करणाऱ्यांना??
> मराठी माणसांसाठी ठोस, सकारात्मक कृती करणाऱ्या देवाभाऊना, की उठसुठ आमची मुंबई म्हणत मराठी माणसाचा जयघोष करीत केवल भावनिक राजकारण करणाऱ्या उबाठा राज ठाकरे युतीला…
पोस्टच्या शेवटी, “उत्तर साफ आहे. मराठीचा हितकर्ता, मुंबईचा विकासधर्ता, मराठी माणसाचा सखा म्हणजे देवाभाऊ!” असं म्हणत उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं आहे.
आता ठाकरेंकडून या पोस्टला काही रिप्लाय येतो का? किंवा ठाकरेंची शिवसेना अथवा राज ठाकरे यावर काही बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.