
Aditya Thackeray May Be Arrested Says Minister: उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो, असं धक्कादायक विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यानं केलं आहे. माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या अटकेबाबत हे विधान राज्याचे मत्यविकास आणि बंदरे मंत्रालयाचे मंत्री नितेश राणेंनी केलं आहे. मिठी नदीच्या गाळ सफाई घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने डिनो मोरीआची चौकशी सुरु केली असल्याच्या प्रकरणावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल केला आहे.
डिनो मोरीआच्या घरावर ईडीचा छापा
डिनो मोरीआच्या घरी परवा मुंबईच्या मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या टीमने छापेमारी केली. मुंबईत विविध ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीनेही स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरूवात केली आहे. आतापर्यंत ईडीने कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीशी संबधित लोकांचे या प्रकरणी जबाब नोंदवले होते. या माहितीच्या आधारे ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भावाचीही झाली चौकशी
मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरीआच्या घरीही ईडीची छापेमारी झाली. शुक्रवारपासून दोन वेळा डिनो मोरीआची या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झाली. या चौकशीमध्ये डिनो मोरीआचा भाऊ सॅटिनो मोरीआ याचीही चौकशी करण्यात आली. शुक्रवारी ईडीने मुंबईत 13 ठिकाणी छापेमारी केली. यापूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने छापेमारी करत 13 जणांना अटक सुद्धा केली होती यात पालिकेचे अधिकारी आणि काही कंत्राटदार तसेच दलाल आहेत.
जेलची वारी करू शकतो
डिनो मोरीआ प्रकरणावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला टार्गेट केले. “उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो” असं म्हणत मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्या अटकेचे संकेत दिले आहेत. “डिनो मोरीआ प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच एकत्रीकरणाची चर्चा आहे,” असंही राणे म्हणालेत. “डिनो मोरीआ प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलची वारी करू शकतो अशी माहिती आहे,” असा मोठा दावा नितेश राणेंनी केला आहे.
शारीरिक संबंधांचा उल्लेख
“डिनो मोरीआ कोणासोबत बसायचा? कोणासोबत भावनिक आणि शारीरिक संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत आहे,” असंही नितेश राणेंनी सांगितलं. राणे यांच्या आरोपाला आता ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.