
Sanjay Raut On Maharashtra Politics: “मुंबई व इतर काही महानगरपालिका सोडल्या तर विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्याने घेतल्या नाहीत. कार्यकर्ते स्थानिक पातळीवर लढले व जिंकले किंवा हरले, पण सरशी भाजपचीच झाली. ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाने `बुथ’ पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. जेथे कार्यकर्ते नाहीत तेथे इतर पक्षांतले लोक सरळ विकत घेतले. निवडणुका जिंकताना कोणतेही सोवळे भाजप पाळत नाही,” असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
लोक शरद पवारांच्या पक्षाच्या राजकारणास यापुढे गांभीर्याने घेतील काय?
“भाजपने ग्रामीण महाराष्ट्रातले सर्व `तालेवार’ लोक, कारखानदार आपल्या पक्षात ओढले. त्यांच्या बळावर ते निवडणुका जिंकत आहेत. फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख नेते ग्रामीण भागात फिरतात व कार्यक्रम राबवतात. निवडणुका लढणे हाच त्यांचा एककलमी कार्पाम आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रत्येक निवडणूक ही अस्तित्वाची लढाई ठरते व त्यानुसार ते ‘स्ट्रॅटेजी’ ठरवतात. पुन्हा सोबतीला पैशांचे बळ आहेच. शिंदे गटाला जिल्हा परिषद निवडणुकीत 162 जागा मिळाल्या. रत्नागिरी, रायगडवर त्यांची सत्ता आली, तर सिंधुदुर्ग भाजपने ताब्यात घेतले. शरद पवारांचा पक्ष विलीनीकरणाच्या गुंत्यात अडकून पडला. पुण्यात ते जिंकले, पण लोक त्यांच्या राजकारणास यापुढे गांभीर्याने घेतील काय? हा प्रश्न आहे,” असं राऊत यांनी ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरामध्ये म्हटलं आहे.
फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देणे चुकीचे
“अजित पवारांच्या अपघाती मृत्यूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली व त्यांच्या पक्षाने 165 जागा जिंकल्या हे मान्य केले तरी महाराष्ट्राच्या राजकारणातील खऱ्या शिवसेनेची पीछेहाट राजकीय समतोल बिघडवणारी आहे. शिवसेनेची पीछेहाट म्हणजे महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या विचारांची पीछेहाट. शिंदे यांचे नेतृत्व हे ठाकऱ्यांपेक्षा मोठे नाही. तरीही प्रत्येक निवडणुकीत शिंदे आघाडी घेतात हे चमत्कारिक आहे. निवडणुकांना पैसा देईल व निवडणूक जिंकून देईल त्यालाच नेता मानण्याची नवी परंपरा रूढ होत आहे. निवडणुका लढण्याची व जिंकण्याची भूक राजकीय पक्षांच्या नेतृत्वास असायलाच हवी. ती सर्वाधिक भूक आज भाजप, शिंदे गट व अजित पवारांच्या पक्षात दिसते. महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली ही भूक विरोधी पक्षांच्या पीछेहाटीस कारण ठरत असेल तर त्यासाठी फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देणे चुकीचे आहे. तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल,” असं राऊतांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> ‘…तर राजकारणात पैसा पाचोळ्यासारखा उडून जातो’; राऊतांनी सांगितली ‘श्रीमंतां’ना हरवणाऱ्या सामन्यांची गोष्ट
जनतेला मूर्ख बनवले जात आहे व…
“लोकभावना अशी आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उद्धव व राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते. मोदी, शहा, फडणवीस-शिंदे यांनी राजकारणाचे पूर्ण व्यापारीकरण केले हे खरे. तरीही त्यांचेही लोक मोठय़ा प्रमाणात पराभूत झाले व सुनीता चव्हाण यांच्यासारखे साधे उमेदवार आजही लोक निवडून देतात. पैसेवाल्यांच्या टकरीत एका पैसेवाल्याचा नेहमीच पराभव होतो हे रायगड आणि सिंधुदुर्गात दिसले. पुणे-बारामतीत भाजपचा पराभव झाला. तेथे अनेक पैसेवाले अनामत रक्कम वाचवू शकले नाहीत. शेवटी आत्मबल आणि जिद्द महत्त्वाची. हरिशंकर परसाई यांनी म्हटले आहे, आत्मविश्वास अनेक प्रकारचा असतो. पैशांचा, सत्तेचा, बळाचा आणि ज्ञानाचा पण मूर्खपणाचा आत्मविश्वास `सर्वोपरी’ म्हणजे सर्वोच्च असतो. महाराष्ट्रात अशा आत्मविश्वासाचे पीक आले आहे. जनतेला मूर्ख बनवले जात आहे व मूर्ख बनण्यास जनता तयार आहे,” असं राऊतांनी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



