
ज्या डॉक्टरांना समाजात देवाचे रूप मानले जाते, त्याच पेशाला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पोटच्या गोळ्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने एका 10 दिवसांच्या चिमुकलीला चक्क 3 लाख रुपयांना विकल्याचा प्रकार समोर आला असून, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार डॉ. नितेश बाजपेयी हा सध्या फरार आहे. गोंदिया येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये एका गरीब दाम्पत्याने आपल्या 10 दिवसांच्या मुलीला उपचारासाठी दाखल केले होते. हीच संधी साधून डॉ. नितेश बाजपेयी याने ‘उपचाराचा खर्च खूप जास्त होईल’ अशी भीती पालकांना घातली. त्यानंतर, नागपूरच्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत मुलीवर मोफत उपचार करून देतो, असे खोटे आश्वासन देऊन त्याने बाळाला आपल्या ताब्यात घेतले. मात्र, या नराधम डॉक्टरने मुलीला उपचारासाठी न पाठवता, भंडाऱ्याच्या पांढराबोडी येथील एका महिलेला 3 लाख रुपयांत विकले. भंडाऱ्याच्या महिला व बालविकास विभागाला पांढराबोडी गावात एका महिलेकडे संशयास्पद रित्या 10 दिवसांचे बाळ असल्याची माहिती मिळाली. अधिकारी चौकशीसाठी पोहोचले असता संबंधित महिलेने पळ काढण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे संशय बळावला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बाळाला ताब्यात घेतले आणि तपासाची चक्रे फिरवली असता या आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. त्यात डॉ. नितेश बाजपेयी (मुख्य सूत्रधार, गोंदिया) – फरार, ललेश्वरी सादेपाच (गोंदिया) – अटक मालती वाघमारे (पांढराबोडी, भंडारा) – फरार, पौर्णिमा धुर्वे (गोंदिया) – फरार, उमेशसिंग गहलोत (गोंदिया) – फरार तपासात समोर आले की, 3 लाखांपैकी 1 लाख रुपये रोख आणि 1 लाखाचा धनादेश मध्यस्थीच्या खात्यात जमा झाला होता. उर्वरित 1 लाख रुपये 5 फेब्रुवारीला दिले जाणार होते. मोठे रॅकेट असण्याची शक्यता गरिबीचा फायदा घेऊन अशा प्रकारे नवजात बालकांची विक्री करणाऱ्या या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे, याचा तपास भंडारा पोलिस करत आहेत. फरार डॉक्टर आणि इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, या घटनेने संपूर्ण विदर्भात संतापाची लाट उसळली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



