
Ajit Pawar Reacts To Eknath Shinde Complaint: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतानाच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधील कथित वादाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. शाह यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांची तक्रार केल्याची चर्चा आहे. या चर्चेवरुन पत्रकारांनी थेट अजित पवारांनाच सवाल केला असता त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये पत्रकारांना या प्रश्नाचं उत्तर दिलं.
एकनाथ शिंदेंने अमित शाहांकडे केली तक्रार? अजित पवार म्हणाले
पत्रकारांनी एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे तक्रार केली असल्याचा संदर्भ देत अजित पवारांना प्रश्न विचारला. “आमच्या अर्थ खात्याच्या फाइल्स क्लिअर होत नाहीत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याचे समजते,” असा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला. अजित पवार यांनी हा प्रश्न ऐकल्यावर प्रतिक्रिया देताना, “मला अमित शहा असं काही बोलले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल तर ते तिकडं तक्रार करतील असं वाटत नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किंवा मला बोलतील. तेवढे आमचे संबंध चांगले आहेत,” असं उत्तर दिलं.
पालकमंत्री पदाबद्दल स्पष्टच बोलले
अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अजून निर्णय झाला नाही यासंदर्भात अजित पवार यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली. “आपण काही काळजी करू नका. सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. डीपीसीसाठी त्यांना जो काही निधी द्यायचा आहे तो सुद्धा आम्ही दिला आहे. त्यावर मार्ग निघेल. मार्ग निघाल्या निघाल्या तुम्हाला सांगितलं जाईल,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत दिली.
…म्हणून रायगडावर भाषण केलं नाही
रायगडावरील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले मात्र अजित पवारांचं भाषण झालं नाही अशी चर्चा असतानाच त्यावर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. “रायगडावर जो अमित शहांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला या कार्यक्रमात मला त्यांनी बोलायला सांगितलं होतं, मात्र जवळपास दोन वाजून गेले होते. त्यामुळेच उशीर झाल्याने मीच स्वतः मुख्यमंत्री आणि अमित शहांना बोला असं सांगितलं होतं,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.
“सारखं सारखं शरद पवार आणि मी दोघे एकत्र…”
“शरद पवार आणि मी दोघे एकत्र असणार का हे सारखं सारखं का पत्रकार बांधव उकरून काढतात? तुमच्याकडे दुसरे काही विषय नाहीत का?” असं यावेळेस अजित पवार मिश्कीलपणे म्हणाले. पुढे बोलताना, “रयत शिक्षण संस्था ही सर्वांची आहे आणि साहेब (शरद पवार) या ठिकाणी अध्यक्षपद भूषवत आहेत. या संस्थेची मॅनेजिंग कौन्सिलची बैठक होती यामुळे या ठिकाणी येणं हे माझं कर्तव्य होतं. ग्रामीण भागातल्या मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. एआयचं ज्ञानदेखील ग्रामीण भागातल्या मुला-मुलींना मिळायला हवं हीच यातील भूमिका आहे,” असं अजित पवार म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.