
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या प्रभाग क्रमांक 173 चा अखेर निकाल समोर आला असून, या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. भाजपचा कथित डुप्लिकेट एबी फॉर्म वापरून निवडणूक लढवलेल्या शिल्पा केळुसकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळे यांचा पराभव केला आहे. शिल्पा केळुसकर यांनी 1,722 मतांनी विजय मिळवत या प्रभागावर आपलं नाव कोरलं असून, हा निकाल शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रभाग क्रमांक 173 हा महायुतीतील जागावाटपामुळे आधीच संवेदनशील ठरला होता. महायुतीअंतर्गत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडण्यात आली होती. त्यामुळे भाजपकडून या प्रभागात अधिकृत उमेदवार देण्यात येणार नव्हता. शिंदेंच्या शिवसेनेने या जागेवर माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या निर्णयानंतरही भाजपच्या शिल्पा केळुसकर यांनी अपक्ष पद्धतीने का होईना, पण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे ही लढत अधिकच लक्षवेधी ठरली. निवडणुकीपूर्वी घडलेला एबी फॉर्मचा वाद या लढतीला वेगळंच वळण देणारा ठरला. सुरुवातीला भाजपकडून शिल्पा केळुसकर यांना अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, नंतर ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला गेल्यानंतर भाजपने केळुसकरांकडून तो एबी फॉर्म परत मागवून घेतला. असे असतानाही शिल्पा केळुसकर यांनी त्या एबी फॉर्मची रंगीत झेरॉक्स प्रत काढून ती जोडत निवडणूक अर्ज दाखल केला. हा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा झाली होती. हा मुद्दा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून शिल्पा केळुसकर यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरू नये, अशी मागणी केली होती. एबी फॉर्मची झेरॉक्स जोडून अर्ज भरणे हे नियमबाह्य असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता. मात्र, या सर्व घडामोडींनंतरही निवडणूक आयोगाने शिल्पा केळुसकर यांचा अर्ज वैध ठरवला आणि त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली. प्रचारादरम्यान केळुसकर आणि कांबळे यांच्यातील लढत अधिकच तीव्र झाली होती. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या. शिल्पा केळुसकर यांच्या समर्थकांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला उद्देशून ‘50 खोके एकदम ओक्के’ अशा घोषणा देत प्रचारात वातावरण तापवलं होतं. याला प्रत्युत्तर म्हणून शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केळुसकर यांना ‘एबी फॉर्म चोर’ अशी हाक मारत टीका केली होती. त्यामुळे हा प्रभाग निवडणूक काळात सतत चर्चेत राहिला. अखेर मतमोजणीअंती शिल्पा केळुसकर यांनी 1,722 मतांची निर्णायक आघाडी घेत पूजा कांबळे यांचा पराभव केला. महायुतीत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आली असतानाही भाजपच्या पार्श्वभूमीच्या उमेदवाराने विजय मिळवणं, हा शिंदेंच्या सेनेसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. विशेषतः रामदास कांबळे हे शिंदेंचे माजी नगरसेवक असल्यानं या पराभवाकडे अधिक गंभीरपणे पाहिलं जात आहे. राजकीय आणि कायदेशीर पडसाद उमटण्याची शक्यता या निकालानंतर आता प्रभाग क्रमांक 173 मधील एबी फॉर्म प्रकरणाचे राजकीय आणि कायदेशीर पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर विरोधकांनी आधीच प्रश्न उपस्थित केले होते, तर शिल्पा केळुसकर यांच्या विजयामुळे हा वाद आणखी गडद होण्याची चिन्हं आहेत. मुंबई महापालिकेच्या राजकारणात हा निकाल केवळ एका प्रभागापुरता मर्यादित न राहता, महायुतीतील अंतर्गत तणाव आणि समन्वयाच्या अडचणीही समोर आणणारा ठरला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



