
Pune Engineer Suicide News : तरुण इंजिनिअरनं आयुष्य संपवण्याच्या घटनेनं पुणे पुन्हा हादरलं आहे. सोमवारी ही घटना घडली असून, ऑफिलची मिटींग मध्येच सोडून IT क्षेत्रात नोकरी करणाऱ्या या 23 वर्षीय तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Crime News)
करिअरच्या सुरुवातीच्याच काळात त्यानं का उचललं टोकाचं पाऊल?
पियुष अशोक कवाडे असं या IT इंजिनिअर तरुणाचं नाव असून, त्यानं पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्क (Hinjewadi IT Park) येथील कार्यालयाच्या इमारतीतील सातव्या मजल्यावरून उडी मारत मृत्यूला कवटाळलं. पुणे पोलिसांच्या माहितीनुसार हिंजवडी आयटी पार्कमधील Atlas Copco कार्यालयाच्या इमारतीवरून सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास तरुणानं आत्महत्येचं पाऊल उचललं. इथं पियुष साधारण वर्षभरापासून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
मिटींग सुरू असतानाच पियुषनं काय केलं?
ऑफिसची मिटींग सुरू असतानाच पियुषनं अचानकच त्याच्या छातीत दुखत असल्याचं कारण सांगत तिथून काढता पाय घेतला आणि काही क्षणांनंतरच त्यानं याच इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलं. या घटनेनं कार्यालयातील प्रत्येकालाच हादरा बसला.
पियुषनं ज्या ठिकाणहून आयुष्याचा अंत केला, तिथूनच एक चिठ्ठी सापडली असून, यामध्ये त्यानं लिहिलेले शब्द प्रत्येकाच्याच काळजावर घाव घालून जात आहेत, अनेकांना विचारांच्या गर्त छायेत लोटत आहेत. ‘मी आयुष्यात सर्वच बाबतीत अपयशी ठरलोय… मला माफ करा’, असं म्हणत वडिलांना उद्देशून आपल्या कृतींसाठी त्यानं क्षमासुद्धा मागितली आणि आपण एक मुलगा म्हणून लायक नसल्याचं म्हणत स्वत:वर दोषारोपण केलं.
पियुष कवाडे हा मुळचा महाराष्ट्राच्या नाशिकचा राहणारा असून, त्यानं लिहिलेल्या पत्रामध्ये/ अखेरच्या चिठ्ठीमध्ये नोकरीतून येणारा ताण किंवा तत्सम कोणत्याही कारणाचा उल्लेख नसल्यानं या घटनेमागं नेमकं कारण काय याचाच तपास केला जात आहे.
पोलिसांचं या संपूर्ण प्रकरणावर काय म्हणणं?
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली. पियुषनं इतक्या टोकाचं पाऊल का उचललं, त्याला या कृतीसाठी कोणत्या घटनांनी प्रवृत्त केलं या अंगानं पोलीस तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.