
Pune Shocking Lepord CCTV Video: शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात नुकताच 13 वर्षीय रोहन बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. य़ा प्रकरणानंतर स्थानिकांनी अगदी रस्त्यावर उतरुन आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यातील शिरुर, खेड, आंबेगाव, जुन्नर ते चार तालुके बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे चर्चेत असून अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. असं असतानाच खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री घराच्या अंगणात झोक्यावर खेळणारा एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे. हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सीसीटीव्हीमध्ये कैद झाला प्रकार
खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे घराच्या अंगणात चिमुकला झोक्यावर खेळत असताना बिबट्या अचानक कुत्र्याची शिकार करण्यासाठी थेट कंपाऊंडमध्ये घुसला. त्यावेळेस हा मुलगा हातात मोबाईल घेऊन ओट्यावरील झोक्यावर झोके घेत होता. समोरुन कुत्रा पळून गेल्याने मुलाचं लक्ष त्याच्याकडे गेलं. या मुलाला अंगणात बिबट्या दिसला. बिबट्या पाहिल्यानंतर त्याने घरात धाव घेतली.
काही क्षणातच चिमुकल्याने प्रसंगावधान राखत घरात धाव घेतली. बिबट्यामुळे घरात पळालेल्या या मुलाचे नातेवाईक नंतर बाहेर आले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्या घाबरून पळून गेला. बिबट्याच्या या थरारक हालचाली सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तुम्हीच पाहा हा सारा थरारक घटनाक्रम…
शिरुरमधील त्या बिबट्याला ठार केलं
पिंपरखेड येथे रविवारी 13 वर्षाच्या रोहन विलास बोंबे या मुलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यांनी अनेक तास पुणे-नाशिक हायवे आडवून धरला होता. बिबट्यांनी मागील काही महिन्यांमध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरुर तालुक्यामध्ये 12 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता बिबट्या आणि मानवी संघर्षासंदर्भात तातडीच्या उपायोजना करण्याची मागणी होत होती. बिबट्याची वाढती दहशत लक्षात घेता त्याला नरभक्षक घोषित करण्यात आल्यानंतर पाच शुटर्सला पाचारण करण्यात आलं. अखेर रात्री या बिबट्याला ठार करण्यात आल्याचं वन विभागाने जाहीर केलं. नरभक्षक बिबट्याच्या पावलांचे ठसे हे ठार करण्यात आलेल्या बिबट्याच्या ठशांशी जुळले असून त्यावरुनच हाच तो बिबट्या असल्याचं स्पष्ट झालं आहे.
नक्की पाहा हे फोटो >> 1200+ बिबटे मुक्तपणे फिरत असलेले 4 तालुके… इथं एवढे बिबटे आलेत कुठून? यामागची कारणं काय? हादरवणारी माहिती
रात्री रंगला थरार
रात्री उशीरा वनविभागाचे कर्मचाऱ्यांना बिबट्या दिसल्यानंतर त्याला बेशुद्ध करण्यासाठी डर्टचा वापर करण्याचा प्रयत्न आधी झाला. मात्र बिबट्याने कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर एकच खळबळ उडाली. रात्रीच्या अंधारात बिबट्या आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांदरम्यानचा थरारक संघर्ष झाला. यावेळी दोन शार्प शूटरच्या मदतीने या बिबट्यावर तीन राऊंड फायर केल्या. या बिबट्याला ठार करण्यात वनविभागाला मोठं यश आलं आहे. हा नरभक्षक बिबट्या सहा वर्षांचा होता. या बिबट्याने दोन आठवड्यात तिघांना ठार केल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं होतं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



