
Karjat Crime News: कर्जत तालुक्यातील ठाकूरवाडी रेल्वे स्टेशनजवळ 16 एप्रिल रोजी एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वे ट्रॅकजवळ आढळलेल्या गुलाबी रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख पटवणे अत्यंत अवघड असतानाही केवळ सुटकेसच्या आधारावर नेरळ आणि कर्जत पोलिसांनी तपास सुरू ठेवत अखेर खूनाच्या प्रकरणाचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे. धनलक्ष्मी एराप्पा रेड्डी ऊर्फ बिंदू (वय 34) रापताडू, आंध्रप्रदेश असे मृत तरुणीचे नाव असून आरोपी हे उच्चशिक्षित असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
या तपासामध्ये रायगड पोलिसांच्या विशेष तुकड्या तपास करीत असताना नेरळ पोलिसांना एक धागा सापडला. नेरळ पोलिसांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून बेंगळुरू येथून दोन आरोपींना अटक केली. तपासादरम्यान पोलिसांनी मुंबईहून दक्षिण भारतात जाणाऱ्या मेल गाड्यांचे सीसीटीव्ही फूटेज बारकाईने तपासले. या तपासात लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघालेल्या मुंबई – कोइंबतूर एक्सप्रेसमध्ये (ता.१५) एक संशयित जोडपं गुलाबी बॅग घेऊन जाताना दिसले. त्यांनी कोणत्या डब्यात प्रवास केला याची शहानिशा करत बेंगळुरू स्थानकावर बॅग नसलेल्या अवस्थेतील त्याच जोडप्याचे दृश्य पोलिसांच्या हाती लागले होते.
बुकिंग तिकीटावरील फोन नंबर आणि लोकेशनच्या आधारे नेरळ पोलिसांनी बेंगळुरूयेथील एका लॉजवर धाड टाकून आरोपी व्हि. विजयकुमार व्यंकटेश (26) चित्तूर, आंध्रप्रदेश आणि टी यशस्विनी राजा वय 24 तिरुपती, आंध्रप्रदेश या दोघांनाही ताब्यात घेतले. आरोपींना 16 मेपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुटकेसमधील मृतदेह कोणाचा हे प्रकरण उलगडलं आहे.
दोघा आरोपींनीच धनलक्ष्मी ऊर्फ बिंदू या तरुणीचा खून करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून रेल्वे ट्रॅकजवळ टाकल्याचे उघड झाले. हे तिघंही मूळचे आंध्रप्रदेशातील असून, सध्या मुंबई आणि बेंगळुरू येथे नोकरीच्या शोधात होते. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यामागे काय उद्देश होता, खून पूर्वनियोजित होता का, हे पोलिस तपासातून पुढे येणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.