
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर पुणे येथे झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद अमरावतीत उमटले. मंगळवारी युवक काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करत धरणे आंदोलन केले. दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांना निवेदनही देण्यात आले. युवक काँग्रेसने दिलेल्या निवेदनानुसार, ही घटना पुणे येथील स्वारगेट मित्र मंडळ चौक परिसरात एका कार्यालयाबाहेर घडली. घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला असून, त्यात भाजपचे तुषार दामगुडे यांनी पवार यांना मारहाण केल्याचे दिसून येत आहे. भाजप पदाधिकाऱ्याचे हे वर्तन अत्यंत निषेधार्ह असून, भाजप सरकार गुंडगिरीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला आपले मत व्यक्त करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. राजकीय मतभेद असले तरी, हिंसाचाराचा मार्ग अवलंबणे हे कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले. अशा घटना लोकशाही मूल्यांवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करणाऱ्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करावी, संबंधित आरोपींवर तात्काळ गुन्हा नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. अमरावती विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव सागर कलाने, शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश गुहे, बडनेरा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष यादव, शहर जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे, एनएसयुआयचे शहराध्यक्ष संकेत साहू यांच्यासह धनंजय बोबडे, मोहीत भेंडे, शुभम बांबल, संकेत भेंडे, गोविंद ठाकरे, प्रथमेश गावंडे, प्रियल मोहोड आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील व नितीन चौधरी उपस्थित होते. यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याच्या गृहखात्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते असताना भाजप कार्यकर्त्यांकडून गुंडगिरीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे या सरकारमध्ये गुंडगिरीला अभय तर दिले जात नाही ना, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रशासनाने तातडीने अहवाल सादर करून जनतेसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



