
Mumbai Metro Largest Depot: वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 अ मार्गिकेच्या कारशेडचा प्रश्न सुटला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे 174.01 हेक्टर जमीन मिळाली आहे. या जागेवर एकात्मिक मेट्रो कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रो 4, 4 अ यांच्यासह मेट्रो 10 आणि मेट्रो 1 या मार्गिकांसाठी मिळून 56 किमी मेट्रो मार्गाचे संचालन येथून होणार आहे.
904 कोटी रुपयांचे कंत्राट
वडाळा ते कासारवडवली या 32.32 किमी आणि मेट्रो 4 अ या 2.7 किमीच्या मार्गिकांचे काम सुरू आहे. या दोन्ही मार्गिकांवर मिळून 32 स्थानके असतील. मेट्रो 4 आणि मेट्रो 6 साठी कांजूरमार्ग येथे एकत्रित कारशेड उभारण्यात येणार होती. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात कांजूरमार्गची जागा कारशेडसाठी मिळू शकली नाही. परिणामी, ही कारशेड मोघरपाडा येथे हलविण्यात आली. एमएमआरडीएने यापूर्वीच या कारशेडसाठी 904 कोटी रुपयांचे कंत्राट मे. एसईडब्ल्यू-व्हीएसई जॉइंट व्हेंचरला दिले आहे. आता ही जागा कंत्राटदाराच्या ताब्यात देण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे झालं शक्य
मुंबईशी अधिक कनेक्टेड आणि प्रवासीकेंद्री वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी मोघरपाडा मेट्रो डेपो महत्त्वाचा ठरणार आहे. मेट्रो 4, 4 ए, 10 आणि 11 या चार मुख्य मार्गिकांसाठीच्या या संचालन केंद्रामुळे झपाट्याने विकसित होणाऱ्या मार्गावर अखंड आणि विश्वासार्ह सेवा मिळू शकेल. स्थानिक शेतकऱ्यांचा विश्वास आणि सहकार्य यामुळे हे शक्य झाले, असं एमएमआरडीएचे महानगर आयुक्त
डॉ. संजय मुखर्जी यांनी म्हटलं आहे.
बाधित शेतकऱ्यांना मिळणार विकसित भूखंड
मोघरपाडा येथील कारशेडमुळे 167 शेतकरी बाधित होत आहेत. त्यातील भाडेतत्त्वावर जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना 22.5 टक्के विकसित भूखंड, तर अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना 12.5 टक्के विकसित भूखंड देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या जमिनीचे भूसंपादन करून ती एमएमआरडीएला हस्तांतरित केली आहे.
मोघरपाडा मेट्रो डेपोमधील महत्त्वाच्या सुविधा खालीलप्रमाणे:
> मोठ्या देखभालीसाठी 10 वर्कशॉप ट्रॅक
> तपासणीसाठी 10 निरीक्षण ट्रॅक
> रात्री गाड्या उभ्या करण्यासाठी 64 स्टेबलिंग ट्रॅक
> चाकांचे प्रोफाइलिंग करण्यासाठी अंडर-फ्लोअर व्हील लेथ
> आवश्यक डेपो कर्मचाऱ्यांसाठी निवासी सुविधा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.