
Raj Thackeray-Uddhav Thackeray alliance: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसंदर्भाती युतीबाबत विधान केल्यानंतर राज्यात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्यासंदर्भात चर्चा रंगली आहे. राज ठाकरेंच्या विधानानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यांना प्रतिसाद दिला असल्याने राज्याच्या राजकारणात नवी नांदी होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. या युतीवर राज्यातील सर्व राजकीय नेते व्यक्त होत असताना आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे रस्त्यांच्या कामाच्या पाहणीसाठी वरळीत पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांना राज ठाकरे – उद्धव ठाकरे यांच्यातील युतीसंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो की, दोन पक्षप्रमुखांनी जे काही बोलायचं होतं ते जाहीरपणे तुमच्या माध्यमातून बोलून झालं आहे. त्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून काही बोलणार नाही”.
राज ठाकरे यांनी काय म्हटलं?
उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात फार काही कठीण वाटत नाही असं मोठं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं आहे. कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमची भांडणं, आमच्या गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे असं सांगत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना युतीसाठी प्रस्तावच दिला.
उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र येऊ शकता का? हे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, “कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमची भांडणं, आमच्या गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात फार काही कठीण वाटत नाही”.
पुढे ते म्हणाले “पण विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. आपण महाराष्ट्राचं मोठं चित्र पाहण्याची गरज आहे, ते मी पाहतोच आहे. माझं म्हणणं आहे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांतील मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा”.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला चालले आहेत. याबद्दल आम्ही लोकसभा निवडणुकीवेळी आवाज उठवला. तेव्हाच विरोध का केला नाही?. तेव्हा बिनशर्थ पाठींबा देऊन तडजोड केली गेली. असे चालणार नाही. भांडण माझ्याकडून नव्हती. मी भांडण मिटवून टाकली. माझ्याबरोबर की भाजपबरोबर जायचं हे मराठी माणसांनी ठरवा. गद्दार सेना चालणार नाही. महाराष्ट्र हितासाठी मी किरकोळ भांडणं विसरायला तयार असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. एकदा एकत्र आल्यानंतर भेटाभेटीचे कार्यक्रम चालणार नाही,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
…तर कायमचं शेतावर जावं लागेल – संजय राऊत
“महाराष्ट्राच्या मनात जी भावना आहे की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही व्यक्त केली आहे. आता काही लोकांना त्याविषयी वेदना होणार. कारण जर उद्धव आणि राज एकत्र झाले तर आम्हाला कायमचं शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ शाखेत जावं लागेल. यातून अनेकांना भीती वाटत असेल. पण त्यातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. आम्ही सकारात्मकपणे याकडे पाहत आहोत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
राज ठाकरेंच्या युतीबाबत न बोलण्याच्या सूचना
दरम्यान राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे – राज ठाकरे युतीबाबत आता चर्चा नको अशी सूचना केली आहे. युतीबाबत माध्यमांशी न बोलण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 29 एप्रिल रोजी राज ठाकरे मुंबईत आल्यानंतर या विषयावर बोलण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.