
कयाधू नदीचे पाणी खरबी बंधाऱ्यातून इसापूर कडे वळविण्याचे काम सुरु असून त्यास स्थगिती का देत नाहीत या प्रश्नावर काम थांबविण्यापेक्षा पर्याय शोधू असे सांगत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी या कामाला स्थगिती देण्यास अप्रत्यक्ष नकार दिला आहे. जिल्ह्याच्या सिंचनाच्या प्रश्नावर बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी पत्रकारांशी बोलतांना दिले आहे. प्रजासत्ताक दिना निमित्ताने पालकमंत्री झिरवाळ हिंगोलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजेश नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी हिंगोलीच्या कयाधूचे पाणी खरबी येथील बंधाऱ्यातून १०० फुट खोल बंधाऱ्याचे काम करून इसापूर धरणात नेला जात आहे. त्याचा हिंगोलीकरांना फायदा होणार नाही उलट जिल्हयाचे वाळवंट होईल. त्यामुळे या कामाला स्थागिती का देत नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला. काम थांबविण्यापेक्षा त्याला पर्याय शोधू आमचे पाणी नेले जात असेल तर आम्हाला काय देणार असा प्रश्न सरकार समोर मांडूत. त्यासाठी जिल्हयातील लोकप्रतिनिधींची अधिवेशन काळात बैठक घेतली जाईल असे पालकमंत्री झिरवाळ यांनी सांगितले. मात्र त्यांनी कामाला स्थगिती देण्यास अप्रत्यक्ष नकारच दिला. या कामाला थेट विरोध करणे हे योग्य नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. येलदरीच्या डाव्या कालव्याच्या प्रश्नावर त्यांनी या बैठकीतच जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय जिल्हयातील मागील अनेक दिवसांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हयात शाळा, अंगणवाडी बांधकाम, वैद्यकिय महाविद्यालय, स्मशानभुमीच्या जागेचा प्रश्न यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी देणार आहोत. मात्र त्यानंतरही शासनाकडून आणखी काही अतिरिक्त निधी मिळेल काय यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात लाडक्या बहिणीच्या ई केवायसीला मुदतवाढ मिळेल पण त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे झिरवाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



