
Raigad Fort Waghya Dog Memorial Controversy : रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन महाराष्ट्रात मोठा वाद सुरु आहे. किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र देखील लिहिलं आहे. या वादात शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) यांनी उडी घेतली आणि वाद आणखी पेटला. संभाजी भिडेंनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीची कथा सांगितली. हा स्रव वाद सुरु असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी शेजारी असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकावी अशी मागणी, माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. समाधी हटवण्यासाठी त्यांनी सरकारला 31 मेपर्यंतची मुदत दिली आहे. वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कुठलाही उल्लेख किंवा संदर्भ सापडत नाही. त्यामुळे अशा प्रकारे कपोलकल्पित कुत्र्याचा पुतळा किंवा समाधी उभारणं, ही छत्रपती शिवाजी महाराजांशी घोर प्रतारणा असल्याचं संभाजीराजे यांचे म्हणणे आहे.
तर, संभाजी भिडे गुरुजींनी रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचे समर्थन केले आहे. संभाजीराजे भोसले बोलतात ते 100 टक्के चुक आहे. वाघ्या कुत्र्या बाबत आपण वाचले आहे आणि ती कथा सत्य आहे असा दावा संभाजी भिडे यांनी केला. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे. माणसं एकनिष्ठ नसतात,तेवढी कुत्री असतात, निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे,याचे धोतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथंच पाहिजे.
दरम्यान, किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समिती नेमणार असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात कुठंही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आढळत नाही. सर्व इतिहासकारांनी देखील हे स्पष्टपणे सांगितले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच समिती गठित होणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. आज शिवपुण्यतिथी निमित्त संभाजीराजे यांनी किल्ले रायगडला भेट देवून शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलं. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.