
Amit Shah : देशाचे गृहमंत्री अमित शाहांच्या अहिल्यानगर दौऱ्यावरून विरोधकांनी शाहांसह राज्य सरकारला देखील लक्ष्य केलं आहे. अहिल्यानगरमध्ये विविध विकासकामांचं शाहांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. मात्र, त्याआधी शनिवारी रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची शिर्डीत बंद दाराआड चर्चा झाली. राज्यातील अतिवृष्टीसंदर्भात बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे केंद्राकडून राज्य सरकारला मदतीचा हात मिळण्याची शक्यता आहे.
बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
शाहांची मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बंद दाराआड चर्चा झाली. शिर्डीतील हॉटेल सन अँन्ड सँडमध्ये तब्बल पाऊणतास बैठक झाली. यावेळी राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसह विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. पुढील आठवड्यात होणारे नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण इतर विकास प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
अमित शाह आणि महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीवरून संजय राऊतांनी टोला लगावला आहे. तिन्ही नेत्यांमधील भांडण सोडवायचे असेल तर बंद दाराआडच चर्चा करावी लागणार असल्याचं म्हणत राऊतांनी खोचक टोला लगावलाय. तर बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला. त्यामुळे अमित शाहांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी तसंच कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. तर केंद्राकडून शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचं अजित पवारांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत मोदींची भेट घेत मदतीची मागणी केली होती. मात्र, राज्यातील परिस्थितीचा संपूर्ण प्रस्ताव केंद्रानं राज्य सरकारकडून मागितला होता. राज्यानं केंद्र सरकारला अजून प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे शरद पवारांनी खंत व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे अमित शाहांनी देखील प्रस्ताव पाठवल्यामुळे भरघोस मदतीचं आश्वासन दिलं आहे.
हेक्टरी 50 हजारांची मदत द्या- वडेट्टीवार
महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करावी अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे. दरम्यान केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून केंद्राकडून मदत मिळणार असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला.
अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय. शेतात आणि घरात शिरलेल्या पाण्यामुळे संसार उघड्यावर आलाय. मात्र, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करून त्यांना हिंमत देण्याची गरज आहे. अमित शाहांनी देखील शेतकऱ्यांना भरघोस मदतीचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे केंद्राकडून शेतकऱ्यांना किती मदत मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.