
केरळ विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. 9 एप्रिल रोजी मतदान तर 4 मे रोजी निकाल जाहीर होणार असून 140 जागांसाठी जोरदार लढत रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) संपूर्ण ताकद पणाला लावत आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत नागपूरसह विदर्भातील भाजप नेत्यांची केरळमधील सक्रिय उपस्थिती विशेष लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्रातील तब्बल 87 नेत्यांना 140 पैकी 81 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. हे नेते सध्या पूर्णवेळ केरळमध्ये ठाण मांडून प्रचार करत आहेत. नागपूरचे आमदार प्रवीण दटके तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील कझकूटम येथे, माजी आमदार अनिल सोले नेयाट्टीनकारा येथे, माजी आमदार गिरीश व्यास नेमम येथे, तर आमदार परिणय फुके पुनजर येथे स्थानिक कार्यकर्त्यांसह जनसंपर्क मोहिमा, सभा आणि संघटन बांधणीवर भर देत आहेत. प्रचार मोहिमेत विदर्भातील इतर नेत्यांचाही मोठा सहभाग दिसून येत आहे. यामध्ये आर्वीचे सुमित वानखेडे, गडचिरोलीचे मिलिंद नरोटे, वरोराचे करण देवतळे, चिखलीच्या श्वेता महल्ले, अकोल्याचे रणजीत पाटील आणि धामणगाव रेल्वेचे प्रताप अडसड यांचा समावेश आहे. हे सर्व नेते विविध मतदारसंघांमध्ये सभा, भेटीगाठी आणि बूथस्तरावर काम करत आहेत. नागपूर व विदर्भातील अनुभवी नेत्यांच्या सहभागामुळे केरळमधील भाजपच्या प्रचाराला मोठी चालना मिळाली आहे. यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. नेत्यांच्या मते, कार्यकर्त्यांची मेहनत आणि स्थानिक जनतेचा पाठिंबा मिळाल्यास यंदा केरळमध्ये भाजपला उल्लेखनीय यश मिळू शकते, असा दावा भाजपने केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.




