
केसरी टूर्सचे संस्थापक आणि अध्यक्ष केसरी पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी वांद्रे येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. मुंबईतील दादर येथील छत्रपती शि
.
केसरी पाटील यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी ‘पर्यटक देवो भव:’ या संकल्पनेतून केसरी टूर्सची स्थापना केली होती. आजघडीला एक जगविख्यात कंपनी म्हणून ‘केसरी’चे नाव घेतले जाते. केसरी पाटील यांना पर्यटन क्षेत्रीतील एक विद्यापीठ म्हणून ओळखले जात होते. अथक परिश्रम आणि कठीण संघर्षातून त्यांनी ‘केसरी टूर्स’ला एका वेगळ्या उंचीवन नेऊन ठेवले. केसरी टूर्स या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील असंख्य नागरिकांना राज्यच नव्हे, तर देश आणि जगभरातील पर्यटनाची गोडी लागली.
केसरी पाटील यांचा पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील मथाने गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात 1935 साली जन्म झाला. मध्यमवर्गीयांचे माफक दरात जग फिरण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1984 साली त्यांनी ‘केसरी टूर्स’ची स्थापना केली. आजघडीला ‘केसरी टूर्स’च्या राज्यासह देशभर आणि जगभर 11 शाखा आहेत, तसेच एकूण कर्मचारी संख्या सुमारे 700 आहे. गेल्या काही वर्षांत केसरीने ब्रँडिंग आणि प्रमोशनपासून ते इन-हाऊस फॉरेन एक्सचेंज सेवांपर्यंतच्या विविध क्षेत्रात विशेषज्ज्ञ असलेल्या 24 उपकंपन्या स्थापन केल्या. पर्यटन क्षेत्रातील अनमोल योगदानासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांचा वारसा कन्या वीणा पाटील यांनी पुढे नेला. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी वेगळी वाट निवडत ‘वीणा वर्ल्ड’ची स्थापना केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शोकसंदेश मराठी माणसाच्या मनात पर्यटनाची आवड रुजवून जगाची सफर करण्याची सवय लावणारे केसरीनाथ पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनक्षेत्राचा दीपस्तंभ अस्तंगत झाला आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केल्या. आपल्या अनोख्या कल्पकतेने आणि कौशल्यपूर्ण व्यवस्थापनाने पर्यटकांना जगभ्रमण करणारे व असंख्यांच्या जगण्यात जगातील आनंददायी अस्तित्वाच्या आठवणी पेरून अनुभवांनी अनेकांचे जीवन समृद्ध करणारे केसरीदादा हे पर्यटनक्षेत्राच्या पटलावरील बिनीचा मोहरा होते. केसरी टूर्सच्या नावाने आयोजित केलेल्या जगभरातील असंख्य सहलींतून त्यांनी देशाचे जागतिक संस्कृतीदूत म्हणून अनामपणे बजावलेल्या भूमिकेचा भारताच्या जागतिक प्रतिष्ठेत मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या निधनाने जगासोबतचा एक सांस्कृतिक दुवा निखळला आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पाटील कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली, असेही एकनाथ शिंदे आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.