
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सातपुडा पर्वतरांगांतील भिंगारा, चालीस टपरी, गोमाल या गावांतील गावकऱ्यांसोबत साजरे केले. दरवर्षी या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचे त्यांचे हे मागील 26 वर्षांपासूनचे व्रत आहे.
.
आदिवासींसोबत दिवाळी साजरी करण्याबाबत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, हा गोमाळ परिसर माझ्यासाठी केवळ एक भूभाग नाही; माझे येथे सखोल ऋणानुबंध आहेत. येथील लोक माझे केवळ आप्तजन नाहीत, तर ते माझे स्वकीय, माझे कुटुंब आहेत. या सर्वांशी माझे अतूट आणि दृढ नाते जोडले गेले आहे.
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, गेल्या 26 वर्षांपासून मी एक व्रत जपले आहे. माझ्या क्षमतेनुसार, माझ्या कुवतीनुसार माझ्याजवळ असलेला प्रकाश घेऊन, जिथे अंधार आहे तिथे पोहोचण्याचे. दिवाळी म्हणजे प्रकाशाची आराधना, आणि माझा हाच प्रयत्न असतो की माझी संपूर्ण शक्ती पणाला लावून हा प्रकाश येथे आणावा, अंधाराचे रूपांतर प्रकाशात करावे. ही परंपरा अखंड ठेवत, यावर्षी मी सलग 27 वे वर्ष येथील आदिवासी बांधवांच्या वस्त्यांमध्ये आणि गावांमध्ये दिवाळी साजरी करत आहे.
आमची ही पद्धत केवळ सणापुरती मर्यादित नसून, मिष्टान्न वाटपाबरोबरच सामुदायिक भोजन, ग्रामसभा आयोजन, वैद्यकीय शिबिरे आणि वस्त्रवाटप हे या उत्सवाचे अविभाज्य घटक आहेत. हे कोणतेही बाहेरून येऊन केलेले औपचारिक सोहळे नाहीत. जसे आपण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतो, तसेच हे माझे कुटुंब आहे आणि आम्ही सर्व मिळून हा प्रकाशाचा सण एकत्रितपणे साजरा करतो, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सातपुडा पर्वतरांग ही मध्य भारतातील एक विस्तृत आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशी नैसर्गिक संपदा आहे. या पर्वतरांगेत अनेक आदिवासी जमातींचे पारंपरिकरीत्या वास्तव्य आहे. या समाजाचे निसर्गाशी एक अतूट नाते आहे; ते पर्वत, वने, झरे, शेती आणि संपूर्ण निसर्गाला जिवंत देवता मानून त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करतात. हर्षवर्धन सपकाळ यांचेही या आदिवासी बांधवांशी एक खास आणि भावनिक नाते निर्माण झाले आहे, जे ते दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने अधिक घट्ट करतात.
यंदाही हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिवासी बांधवांसाठी दिवाळीनिमित्त नवीन कपडे, जीवनावश्यक साहित्य आणि औषधे घेऊन जाण्यासाठी मोठा प्रयत्न केला. या भागांत रस्ते नसल्याने गावात पोहोचणे मोठे दिव्य ठरले. पाऊस पडल्यामुळे ट्रॅक्टर चिखलात फसले, तरी स्वयंसेवकांनी अथक प्रयत्न केले. या सर्व अडचणींवर मात करत प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी आदिवासी बांधवांसोबत ही दिवाळी मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदमय वातावरणात साजरी केली, ज्यामुळे त्यांचे हे नाते अधिक दृढ झाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



