
पुण्यातील कोंढवा परिसरात झालेल्या गणेश काळे या रिक्षाचालकाच्या निर्घृण हत्याप्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. चार आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत. प्राथमिक तपासानुसार, मृत गणेश काळे हा कोमकर गँगशी संबंधित समीर काळेचा भाऊ आहे. समीर काळे
.
अमन मेहबूब शेख ( वय 23, रा. काकडे वस्ती गल्ली नं. 2, कोंढवा, पुणे) आणि अरबाज अहमद पटेल (वय 25, रा. काकडे वस्ती गल्ली नं. 3, कोंढवा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोन प्रौढ आरोपींची नावे आहेत. तर इतर दोघे 17 वर्षीय अल्पवयीन आरोपी आहेत. यातील एक आरोपी हा कृष्णा आंदेकरचा निकटवर्तीय असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी या आरोपींना खेड शिवारातून पकडले असून, त्यांच्या शोधासाठी तब्बल 11 पथके तयार करण्यात आली होती.
रिक्षा अडवून गोळ्या घातल्या, कोयत्यानेही केले वार
यासंबंधीच्या वृत्तानुसार, गणेश काळे हा शनिवारी दुपारी आपली रिक्षा चालवत येवलेवाडी येथून खडीमशीन चौकाकडे येत होता. त्यावेळी दोन दुचाकींवरून आलेले चार हल्लेखोर त्याच्या मागावर होते. त्यांनी पेट्रोलपंपाजवळ त्याची रिक्षा अडवली आणि थेट गोळीबार केला. सहा गोळ्यांपैकी चार गोळ्या काळे यांच्या मानेत, छातीत आणि पोटात घुसल्या. गंभीर जखमी अवस्थेत तो जागीच कोसळला. इतकेच नव्हे तर, हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयत्याचे वार करून त्याचा मृत्यू झाल्याचे निश्चित केले आणि घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
एक दुचाकी घटनास्थळीच सोडून आरोपी फरार
घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, निखिल पिंगळे आणि एसीपी विजय कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेतली. गणेश काळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनास्थळी पोलिसांना एक दुचाकी मिळून आली असून, तिचा वापर हल्लेखोरांनी केल्याचे समजते. ते दोन दुचाकींवर आले होते, मात्र हल्ल्यानंतर एक दुचाकी घटनास्थळीच सोडून एकाच वाहनावरून चौघांनी पळ काढला. पोलिसांनी परिसरातील पेट्रोलपंप आणि इतर सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.
आंदेकर खून प्रकरणाशी संबंधाची शक्यता
गणेश काळे हा वानराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ होता. या संबंधामुळे हत्येमागे टोळीतील जुने वैमनस्य किंवा सूढाची भावना असू शकते, अशी शक्यता व्यक्त केला जात आहे.
1 सप्टेंबर 2024 रोजी पुण्यातील नाना पेठ परिसरात माजी नगरसेवक वानराज आंदेकर (वय 40) यांचा गोळीबार करून खून करण्यात आला होता. त्यांच्या घराजवळच बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी ही हत्या केली होती. हल्ल्यात गोळ्यांसह धारदार शस्त्रांचाही वापर करण्यात आला होता. या खुनामागे कौटुंबिक मालमत्तेचा वाद आणि गॅंगवॉर हे दोन्ही मुद्दे असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. वानराजची बहीण संजिवनी कोमकर आणि तिचे पती जयंत कोमकर, तसेच गणेश कोमकर आणि समीर काळे (उर्फ सॅम काळे) यांना आरोपी म्हणून २१ जणांच्या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आले होते.
वानराज आंदेकरच्या हत्येनंतर, 5 सप्टेंबर 2025 रोजी नाना पेठ परिसरातच 18 वर्षीय आयुष गणेश कोमकर (गणेश कोमकरचा मुलगा) याचाही गोळीबार करून खून करण्यात आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो वानराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केलेला हल्ला होता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



