
Kolhapur News: कोल्हापुरात सुरू झालेल्या भिमा कृषी प्रदर्शनाने (Bheema Krushi Pradarshan) यंदा वेगळ्याच कारणामुळे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शेतीसंबंधित तंत्रज्ञान, साधने आणि पशुपालनाची माहिती मिळवण्यासाठी येणाऱ्या लोकांना यावेळी एक अनोखा अनुभव मिळत आहे. प्रदर्शनात 5 फूट लांबीचा अमेरिकन इग्वाना पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. कुटुंबासह आलेले पर्यटक, विद्यार्थी आणि लहान मुले या सरड्याला पाहून आश्चर्यचकित होत आहेत. फोटो काढण्यासाठी आणि जवळून पाहण्यासाठी रांगा लागत असून प्रदर्शनाला मनोरंजनाचा वेगळाच रंग चढला आहे.
भिमा कृषी प्रदर्शनात खास आकर्षण
पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या कृषी प्रदर्शनांपैकी एक असलेल्या या प्रदर्शनात प्रथमच हा दुर्मिळ सरडा आणण्यात आला आहे. मध्य व दक्षिण अमेरिकेतील तसेच United States च्या उष्ण प्रदेशात आढळणारा हा इग्वाना आकाराने मोठा आणि वेगळ्या रूपामुळे लक्ष वेधतो. महाराष्ट्रात प्रत्यक्ष पाहण्याची संधी क्वचित मिळत असल्याने लोकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार प्रदर्शन केवळ शेतीपुरते मर्यादित न ठेवता माहिती आणि अनुभव देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळपासून संध्याकाळपर्यंत नागरिकांची गर्दी या विभागात पाहायला मिळत आहे. शालेय विद्यार्थी आणि तरुण मंडळी प्राण्यांविषयी माहिती जाणून घेत आहेत. अनेक जण मुलांना प्रत्यक्ष दाखवण्यासाठी खास प्रदर्शनात येत आहेत. कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी हा वेगळाच आकर्षणबिंदू ठरला आहे. त्यामुळे प्रदर्शनात येणाऱ्यांची संख्या वाढल्याचेही आयोजक सांगतात.
सरड्याबद्दल रंजक माहिती
सरड्याचे मालक किशोर चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार हा इग्वाना पूर्णपणे शाकाहारी आहे. लहानपणी त्याचा रंग हिरवा दिसतो, पण वयानुसार रंग बदलत जातो. उन्हात बसल्यावर शरीरावर हलका काळसर छटा दिसते. हा प्राणी उष्ण वातावरणात राहतो आणि थंडी सहन करू शकत नाही. त्याचे वजन सुमारे 22 किलो असून उंची जवळपास 5 फूट आहे. सध्या त्याचे वय 8 वर्ष असून आयुष्य साधारण 30 वर्षांपर्यंत असते.
ज्ञान आणि मनोरंजनाचा संगम
या प्रदर्शनामुळे कृषी क्षेत्राबरोबरच वन्यजीवांविषयी जनजागृती होत असल्याचे चित्र दिसत आहे. मुलांना प्राण्यांविषयी प्रत्यक्ष माहिती मिळत असून अनेकांना हा अनुभव पहिल्यांदाच मिळत आहे. शेती, तंत्रज्ञान आणि मनोरंजन यांचा संगम साधत भिमा कृषी प्रदर्शन नागरिकांसाठी माहितीपूर्ण आणि लक्षात राहणारा उपक्रम ठरत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



