
Sushma Andhare to Anjali Damania: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यात सध्या जोरदार वाकयुद्ध सुरु आहे. आपल्याविरोधात बातम्या पेरत असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी अंजली दमानियांवर केलाय. त्यांनी एक खुले पत्र अंजली दमानियांना लिहीलंय. ज्यात त्यांनी महायुतीच्या कारभारवर तुम्ही प्रश्न उपस्थित का करत नाही? केवळ ठराविक लोकांना का टार्गेट करता, असे विचारत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
सुषमा अंधारे यांनी अंजली दमानियांचा पत्राच्या सुरुवातीला हौशी सामाजिक कार्यकर्त्या असा उल्लेख केलाय. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘विरोधक पहिल्यांदा तुमच्या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. फार त्रास होत असेल तर टिंगल टवाळी करून तुम्हाला शुल्लक ठरवण्याचा प्रयत्न करतात. त्यानेही काही साध्य नाही झाले तर तुम्हाला घाबरवतात धमकवतात. तरीही काम नाही थांबवलं तर ते तुमच्याबद्दल तुमच्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.’ तुम्ही नेमकं तेच करताय, असे सुषमा अंधारे दमानियांना म्हणाल्या.
काय आहे नेमकं प्रकरण?
तुम्ही माझ्या विरोधात पत्रकारांमध्ये बातमी पेरायचा प्रयत्न केला. तेव्हा तुमचा बालिशपणा म्हणून मी सोडून द्यायचं ठरवलं होतं. पण आज तुम्ही पुन्हा ट्विट करत तुम्हाला आडनावावर बोलता येत नाही असं सांगितलं. तुमच्या जरा मी लक्षात आणून दिलं पाहिजे तुम्हाला आडनावावर बोलता येत की नाही हा संशोधनाचा विषय आहे मात्र आडनाव बघून तुम्हाला अजेंडे राबवता येतात हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे.. अर्थात तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड रस असेल तर तुमच्यासाठी दोन करिअर लाईन सुचवते. Whisper campaign करणाऱ्या एखाद्या भिशी ग्रुपला जॉईन करा. नाहीतर थेट उजळ माथ्याने राजकीय पक्षांमध्ये सामील व्हा . म्हणजे तिथून तुम्ही बोललात तर तुमच्या बोलण्याला थोडसं वेटेज असेल. अर्धवट माहितीवर तुमच्या पद्धतीने तुम्ही व्यक्त होता ते फार हस्यास्पद असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.
‘तुमच्या चुका लक्षात आणून देणे गरजेचे’
मी सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातल्या कोणत्या नेत्यांना भेटते त्यांच्याशी काय बोलते याचा अहवाल मी माझ्या पक्षप्रमुखांना नक्की द्यायला हवा. पण तुमच्यासारख्या इतरांच्या पे रोल वर काम करणाऱ्यांना मी स्पष्टीकरण द्यावी इतकी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही. पण तुमचा बुरखा फाडणे गरजेचे आहे…! ठाकरेंची चूल कशी पेटते? शरद पवारांनी काय भ्रष्टाचार केला यावर बोलण्याची तुम्हाला प्रचंड उबळ येते म्हणून तुम्हाला आरसा दाखवण्याची गरज आहे…!! कराड टोळीतील काही जणांचे खून झाले असल्याची माहिती कोणीतरी तुम्हाला फोनवरून दिली आणि लगेच पत्रकार परिषद घेऊन, ती तुम्ही जाहीरही केली होती! अशा बेजबाबदारपणाचा पुढचा टप्पा तुम्ही माझ्याबाबत गाठला आहे!अशा कितीतरी गोष्टी आणि त्या उचापती तुम्हाला करायच्या असतात. तुमच्या व्यवसायाची गरज म्हणून तुम्हाला त्या करायचे असतील तर तुम्ही त्या निश्चितच कराव्यात. पण असे करताना तुमच्या एक लक्षात आणून देणे गरजेचे असल्याचे अंधारेंनी आपल्या पत्रात म्हटलंय.
भाजपच्या नेत्यांबद्दल ममत्व?
धनंजय मुंडे यांची शिकार तुम्ही केली या भ्रमात तुम्ही असाल तर लवकर जग्या व्हा. जनमताचा रेटा इतका होता की मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. तुमचं फार योगदान आहे या भ्रमातून बाहेर या. जसे उज्वल निकम ने कसाबला फाशी देण्यात मोठे योगदान दिले हा एक मोठा भ्रम आहे. ( तिथे कुणीही असतं तर कसाबला फाशी झाली असते)! तसाच मुंडेंचा गेम तुम्ही केला हा तुमचा फाजील आत्मविश्वास आहे. भाजपाला जे जे डोईजड वाटतात भाजपा त्याला पद्धतशीर संपवते. हे एव्हाना धनंजय मुंडे यांच्या सुद्धा लक्षात आलेच असेल. असो.
तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढता अशी तुमची ख्याती आहे म्हणे (! ) मग आता काही प्रश्न तुमच्यासाठी. उद्धव ठाकरेंची चूल कशी चालते ? धनंजय मुंडे यांना मोठे करणारे शरद पवार होते. असे म्हणत कायम पवार किंवा ठाकरे यांना लक्ष करणाऱ्या तुम्ही भाजप आणि भाजपच्या नेत्यांबद्दल तुमच्या मनात ममत्व भाव का आहे ? असा प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केला.
‘सोयीस्कर मौन का बाळगता?’
तुम्ही नागपूरच्या. बाजूला चंद्रपूर. खाणीसाठी प्रसिद्ध. या खाण बाजारात करोडो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार असेल.. त्यावर कधी तुम्ही चकार शब्द बोलताना का दिसला नाहीत. सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी झाडे लावल्याचा दावा केला. ती झाडे कुठे आहेत त्याची आकडेवारी किंवा त्यावरचा खर्च यावरही तुम्ही काही बोलताना का दिसला नाहीत? नागपूरहून कधी तुम्ही नाशिक मध्ये भ्रष्टाचाराची चौकशी करायला जाता.. पुण्यात येता आणि कुठल्या कुठल्या शहरात जाता. पण नागपूर मध्ये संकेत बावनकुळे प्रकरणात तुम्ही काहीं बोलताना दिसलंच नाही.
पुण्यात तुम्ही आलात पण एका राष्ट्रवादीच्या आमदारासाठी आलात. मुळात पुण्यात ससून हॉस्पिटल ललित पाटील ड्रज प्रकरण यावर तुम्ही सोयीस्कर मौन बाळगलं. जलयुक्त शिवाराचे फार मोठे काम झाले महाराष्ट्रात. असा दावा भाजपाने केला मात्र ऐन जानेवारीपासूनच राज्यात टँकर माफीयांचा सुळसुळाट सुरू झाला. जलयुक्त शिवाराच्या बोगस कामांबद्दल तुम्ही चकार शब्दाने बोलला नाहीत, याची आठवण अंधारेंनी करुन दिलीय.
‘भाजपच्या प्रकरणांवर बोलणार नाही का?’
मराठा समाजाच्या सामाजिक आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी जे कार्यालय भाड्याने घेतले त्या कार्यालयाचे फक्त भाडं पावणेचार कोटी दाखवणाऱ्या आयोगाच्या गैरकारभारावर बोलायला तुम्हाला वेळ आहे का ? आयोगावर काम करणाऱ्या पाटील या व्यक्तीची प्रतिनियुक्ती गिरीश महाजन यांच्या पत्रावर झाली म्हणून तुम्हाला यावर बोलावसं वाटत नाही का? मध्यान्ह भोजन योजनेत घोटाळा मध्ये शेकडो कोटी रुपयांचा अपहार झाला यावरही तुम्ही काही बोलताना दिसला नाहीत. अमृता फडणवीस यांनी ज्या अनिक्षा जयसिंगानी च्या विरोधात एफ आय आर केली होती. ते नेमकं प्रकरण काय होतं कोण कोणाला ब्लॅकमेल करत होतो . यातला मॅच फिक्सिंग आणि बुकी यांचा काय नेमका संबंध होता यावर तुम्ही चकार शब्दाने व्यक्त झाला नाहीत.पॅराडाईज ग्रुप ऑफ कंपनी, मंगल प्रभात लोढा, अजय आशर, बीव्हीजी क्रिस्टल कंपनी या मोठ्या आणि गब्बर माशांबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही हे कसे शक्य आहे. पण हे महाशक्तीशी संबंधित आहेत म्हणून यावर काही बोलायचं नाही का? ऐन निवडणुकीच्या काळात पैसे वाटप प्रकरणांमध्ये वादात अडकलेले विनोद तावडे यावर तुम्ही सोयीस्कर मौन का बाळगलं ? राधाकृष्ण विखे पाटलांनी तब्बल दहा हजार शेतकऱ्यांची फसवणूक करत नऊ कोटी रुपयांचा अपहार केला माननीय सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करायला लावला यावर तुमचं एका वाक्याने ट्विट आलं नाही.किरीट सोमय्याने ज्या ज्या लोकांवर आरोप केले आणि ट्रकभर पुरावांचे रद्दी माध्यमांच्या समोर दाखवली त्याच सगळ्या लोकांना पुन्हा भाजपाने सामावून घेतले यात हर्षवर्धन पाटील, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक, भावना गवळी, रवींद्र वायकर, विखे पाटील, अशोक चव्हाण, यांच्या फायलींचे पुढे काय झालं? जर ते निर्दोष होते आणि त्यांना मुद्दा म्हणून त्रास झाला असेल तर पुढे निर्दोष सिद्ध झाल्यानंतर यातल्या एकानेही भाजपावर आब्रु नुकसानीचा दावा का टाकला नाही? किंवा आमची ती चूक होती हे सगळे लोक खरोखरच स्वच्छ होते आमचा गैरसमज झाला असे म्हणत फडणवीस किंवा किरीट सोमय यांनी यांची जाहीर माफी का मागितली नाही ? हा प्रश्न फडणवीसांना किंवा भाजपाला विचारावा असं तुम्हाला एकदाही का वाटलं नाही? वर्णन केलेली सगळी प्रकरण ही भाजपाची आहेत म्हणून यावर तुम्हाला बोलायचे नाही का ? असा प्रश्न अंधारेंनी दमानियांना केलाय.
पुढचं टार्गेट कोण दिलंय?
‘तुम्ही राजकारण सोडून समाजकारण चालू ठेवले आहे, असा तुमचा पवित्र असतो. परंतु तुम्ही राजकीय सुपाऱ्या घेता, असा आरोप पूर्वी अभंग राष्ट्रवादीनेच केला होता. मात्र राजकारणच करायचे असेल आणि तेही एकांगी, तर तसे उघड उघड करावे. पण तुम्ही ‘मुंबईच्या लेडी अण्णा हजारे’ बनू पाहत आहात. भ्रष्टाचार केवळ पैशांचा नसतो… महाशक्तीच्या लाडक्या ताई.. वैचारिक अप्रामाणिकपणा आणि लबाड्या म्हणजे देखील भ्रष्टाचारच! माझं सोडा, मी मध्यमवर्गीय आहे. पण खरं खरं सांगा, खडसे भुजबळ यांच्यानंतर तुमच्या आकाने तुम्हाला पुढचं टार्गेट कोण दिले आहे ? असा प्रश्न त्यांनी दमानियांना केलाय. या पत्राला अंजली दमानिया काय उत्तर देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.