
Mumbai-Goa Vande Bharat Express: जून महिना संपत आला आहे. ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सवाची धूम सुरू होणार आहे. चाकरमान्यांना आत्तापासूनच गावी जाण्याचे वेध लागले आहेत. कोकणातील गणेशोत्सवाची आगळीच मजा असते. अनेक चाकरमानी आधीपासूनच रेल्वेचे तिकीट बुक करुन ठेवतात. कारण कोकणात रस्तेमार्गे जाणे खूप हैराणीचे ठरू शकते. मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळं चाकरमान्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. अशावेळी अनेक चाकरमानी रेल्वेच्या प्रवासाचा प्राधान्य देतात. अशातच प्रवाशांसाठी एक चिंतादायक बातमी समोर येत आहे. गणेशोत्सव काळात वंदे भारत एक्स्प्रेसने जाण्याचा प्लान करताय तर तुमचा हिरमोड होऊ शकतो.
कोकण रेल्वे मार्गावर लागू केलेल्या मान्सून वेळापत्रकामुळं मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसच्या शेकडो फेऱ्या रद्द होणार आहेत. ऑक्टोबरपर्यंत मान्सून वेळापत्रक लागू राहणार असल्याने ‘वंदे भारत’मधून कोकण प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या पर्यटकांची निराशा झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मडगाव स्थानकापर्यंत दररोज धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. प्रवासी तिकीट बुकिंग करताना ‘वंदे भारत’ला प्राधान्य देतात. मात्र पावसाळ्यात कोकण रेल्वेचा प्रवास करू पाहणाऱ्या प्रवाशांना मान्सून वेळापत्रकामुळे ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमधून प्रवास करता येणार नाही.
कोकण रेल्वे मार्गावर 20 ऑक्टोबरपर्यंत मान्सून वेळापत्रक लागू राहणार असून या अवधीत अप आणि डाऊन मार्गावरील ‘वंदे भारत’ एक्सप्रेसच्या शेकडो फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. मान्सून वेळापत्रकानुसार ऑक्टोबर महिन्यापर्यंत सीएसएमटी ते मडगावदरम्यान धावणारी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस आता आठवड्यात तीन दिवस चालवली जाणार आहे.
दरम्यान, 23 जूनपासून कोकणात जाणाऱ्या ट्रेनच्या तिकिटांची बुकिंग सुरू आहे. मात्र पहिल्याच दिवशी नियमित गाड्यांची तिकीट फुल्ल झाली आहे. सोमवारी सकाळी 22 ऑगस्टच्या प्रवासासाठी आरक्षण सुरू होताच कोकणातील सर्व प्रमुख गाड्यांचे तिकीट बुकिंग फुल्ल झाले आहे. कोकणकन्या, मांडवी आणि तुतारी एक्स्प्रेससह वंदे भारत आणि जनशताब्दी एक्स्प्रेस्लाही प्रचंड वेटिंग लागले आहे. कोकणकन्या, मांडवी, तुतारी एक्स्प्रेसच्या सर्व तिकिटा संपल्या आहेत. तर वंदे भारत एक्स्प्रेस जनशताब्दी एक्स्प्रेस प्रतीक्षा यादी 76 आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.