
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभी उद्धव ठाकरेंनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, राज ठाकरेंसोबत आपण ‘वादळात’ खेळून मोठे झाल्याचे आवर्जून सांगितले. वडिलांशी असलेले नाते आणि आईने (मा) घर सावरण्यात दिलेल्या योगदानाचा गौरव करतानाच त्यांनी आपल्या घराण्याबद्दल सार्थ अभिमान व्यक्त केला. तसेच, विरोधकांवर आणि गद्दारांवर कडाडून टीका करताना ‘गद्दारी हा महाराष्ट्राला लागलेला शाप’ असल्याचे सांगून, भगव्याशी गद्दारी झाली नसती तर महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलला असता, असा रोखठोक विचार त्यांनी यावेळी मांडला. उद्धव ठाकरे म्हणाले, आजपासून शिवसेनाप्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. आपण अनेकांनी चढ उतार पाहिले आहेत. राज आणि माझे बालपण एकत्र गेले आहे. आम्ही वादळात खेळत मोठे झालो आहोत. त्यामुळे आम्हाला वादळाशी कसे लढायचे, हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. आज आपल्याशी बोलताना तो सगळा काळ डोळ्यांसामोरून जात आहे. मी नेहमी सगळ्यांना सांगतो की शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट ही ओळख लोकांसाठी. वडील आणि मुलाचे नाते वेगळे होते. माझे आजोबा म्हणजे जमदग्नीचा अवतार आणि तसे वडील आणि त्याच्या विरुद्ध आमची मा. या सगळ्यात माचे योगदान फार मोठे आहे. मा ने शांतपणे संपूर्ण घर सांभाळत होती, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितली. मला माझ्या घराणेशाहीचा अभिमान हे जे काही आमचे घर आहे, घराने आहे, तुम्ही त्याला घराणेशाही म्हणा, मला अभिमान आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता जे विरोधक आहेत, त्यांना त्यांच्या वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटत असेल. जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा जर इतिहास पाहिला तर गद्दारी हा विषय पूर्वापार चालत आलेला आहे. गद्दारी हा आपल्याला लागलेला शापच आहे. जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो. गद्दारी जर भगव्याशी झाली नसती, तर या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता. मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापऱ्यांचे गुलाम म्हणून जगणार नाही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ठाकरे नावाचे झाड का तोडायची आहे यांना, तर या झाडाची खाण होत नाहीये. आज मुंबईत या निवडणुकीत पैशांचा वापर केला गेला. विकत घेत आहेत तुम्ही? मत विकत घेऊ शकतात, पण मन कसे विकत घेणार? कोण आहोत आम्ही? ठाकरे म्हणजे कोण आहोत? शिवसेना पुसून टाका आणि मग मुंबई आणि महाराष्ट्राचा विचार करा. बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचे कसे हे आधी शिकवले. जर जगायचे कसे हेच आपण विसरून गेलो तर जसे पूर्वी गुलामगिरीत जगायचो, तसेच या दोन व्यापरांच्या गुलामीत जगावे लागेल. मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापऱ्यांचे गुलाम म्हणून जगणार नाही, असे म्हणत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. गद्दारांनी वार केले याचे दुःख पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही काही लढाईला घाबरणारे नाही आहोत. मराठ्यांचा इतिहास जेवढा रक्तरंजित आहे, कदाचित तसा इतिहास जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाचा नसेल. पण त्या रक्तरंजित इतिहासात पाठीवरचे वार हे जास्तकरून गद्दारांनी केले आहेत. याचे जास्त दुःख आहे. काय मिळवले? मुंबईवरचा भगवा उतरवला, काय महापौर पद? जे जे गड मुंबईचे होते ते गड आजही शाबूत आहेत. आपल्याला जपणारे कोण आहे, याचा विचार मुंबईकरांनी तसेच इतरांनी देखील केला पाहिजे. आपल्या जीवाचा सौदा करणारा आणि वाचवणारा कोण? याचा विचार लोकांनी करायला पाहिजे. गद्दारी करणाऱ्यांना किती 50 खोके मिळाले, मी गेलो तर मला किती मिळतील? पण मी गेलो तर मला यांचे नाव घेता येणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या फोटोकडे हात दाखवला. भाजपचा एक सुद्धा त्या दंगलीत नव्हता उद्धव ठाकरे भाजपवर टीका करताना म्हणाले, जेव्हा दंगल झाली होती, तेव्हाच्या आता इथे जमलेल्या अनेकांवर आजही केसेस आहेत. तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी श्रीकृष्ण अहवालाला केराची टोपली दाखवली होती. भाजपचा एक सुद्धा त्या दंगलीत नव्हता. गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही, असे भाजपवाल्यांचे आहे. प्रत्येक वेळेला लढा म्हटले की शिवसैनिक. नंतर मग फोटो काढायला हे येतात. आम्ही हिंदू आहोतच. या देशात आपण हिंदू बहुसंख्य आहोत, पण आपले देव वेगळे, संस्कृती वेगळी त्यामुळे आपण विखुरलेले आहोत. या सगळ्या हिंदूंना एकवटणारा एकमेव हिंदूहृदय सम्राट होते. आजपासून जय महाराष्ट्र म्हणा आज जय महाराष्ट्राला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. वेगवेगळे भगवे फडकत आहेत. अभिमानाने म्हणा जय महाराष्ट्र. जो कोणी आपल्यावर संस्कृती लादणारा असेल तो तिथेच गार झाला पाहिजे, अशा आवाजात जय महाराष्ट्र म्हणा. आम्हाला संस्कार शिकवण्याची गरज नाही. आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. शिवसेनेचा जन्म हा सत्तेसाठी नाही झालेला. तर मराठी माणसाच्या भूमिपुत्रासाठी आणि न्याय हक्कासाठी ही शिवसेना आहे. मला तर असे वाटते की तुम्ही शिवसेना प्रमुखांपेक्षा काकणभर प्रेम जास्त माझ्यावर करता. कारण मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, आदित्यवर जास्त प्रेम करता, का कारण तो बाळासाहेबांचा नातू आहे. नाहीतर आमचे कर्तुत्व काय आहे? कर्तुत्व जरी नसले तरी वादळात खेळत मी मोठा झालो आहे आणि तुमच्या सगळ्यांची जबाबदारी घेऊन मी पुढे जात आहे. आपला थोडक्यात पराभव झाला आहे. पुन्हा नव्याने सुरुवात करु मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना म्हणून आपला जन्म झाला आहे. थोडक्यात निसटता पराभव आपला झाला आहे. इतर ठिकाणी निवडणुका होत आहेत. निवडणुका जिंकण्याचे तंत्र त्यांनी आणले. परत नव्याने सुरुवात करायची आहे. पुन्हा नव्याने सुरुवात करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेला नवी पालवी फुटलेली आहे. पानगळ होणे गरजेचे असते. सडलेली झडलीच पाहिजेत, ती सडेपर्यंत नवे कोंब फुटत नाहीत. सडलेल्या पानात जीव नाही, विकली गेलेली पानं झाडाला तरारी देऊ शकणार नाही. आज सुद्धा प्रत्येक वॉर्डात एकापेक्षा एक सरस उमेदवार बसले होते. काही जणांना सर्व काही दिलं तरी ते नाराज झाले. मला सर्व शिवसैनिक सारखे आहेत. जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



