
मिलिंद आंडे, (प्रतिनिधी) वर्धा : महात्मा गांधी आणि विनोबा भावेंची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातली दारुबंदी उठवण्याची मागणी खासदार अमर काळेंनी केलीय. वर्धा जिल्ह्यातली दारुबंदी कागदावर आहे. त्यामुळं दारुविक्री कायदेशीर करावी असा अजब तर्क अमर काळेंनी मांडलाय. एवढंच नव्हे तर नकली दारु लोकांना प्यायला देण्यापेक्षा अस्सल दारु पिण्यासाठी दारुबंदी उठवावी असं तर्कटही खासदार महोदय सांगतायेत.
महात्मा गांधींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यात दारुबंदी आहे. आता हीच दारुबंदी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदाराच्या डोळ्यात सलू लागलीये. खासदार अमर काळे यांनी गांधी आश्रम असलेल्या सेवाग्राम आणि पवनार वगळून दारुबंदी हटवण्याची मागणी खासदार अमर काळेंनी केलीय. वर्धा जिल्ह्यात दारुबंदी कागदावरच आहे असं अमर काळे सांगतात. दारुबंदीच्या कठोर अंमलबजावणीचा आग्रह धरण्याऐवजी त्यांनी थेट दारुबंदीच उठवण्याची अजब मागणी केलीय.
भाजपनं दारुबंदी उठवण्याला विरोध केलाय. पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातली दारुबंदी कठोरपणे राबवावी अशी मागणी भाजपनं केलीय. सामान्य वर्धेकरांमधील मद्यप्रेमी मात्र दारुबंदी हटवण्याबाबत तत्वज्ञान सांगत फिरतायेत. नकली दारु चोरुन पिण्यापेक्षा अस्सल दारु लोकांना पिण्यासाठी दारुबंदी हटवावी अशी वकिली तत्वज्ञान काही वर्धेकर झाडताना दिसतायेत.
दारुबंदी कागदावर आहे तर तिची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. नकली दारु विकली जात असेल तर तिच्यावर कठोर निर्बंध टाकले पाहिजेत. पण बेकायदा दारु विकली जातेय म्हणून दारु विक्री अधिकृत करणे हे शहाणपणाचं नाही. दारुविक्रेत्यांशी असलेल्या आर्थिक हितसंबंधातून अशी मागणी होत नाही ना असाही संशय या निमित्तानं व्यक्त केला जातोय. त्यातही शरद पवारांच्या पक्षाचा खासदार महात्मा गांधींचा आश्रम असलेल्या जिल्ह्यातली दारुबंदी उठवण्यासाठी जास्त आग्रही आहे हे खेदजनक म्हणावं लागेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.