
राज्यात मराठी नववर्षाचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असून गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, नागपूरसह अनेक शहरांमध्ये भव्य शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात नागरिक पारंपरिक वेशात सहभागी होत असून ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या सजावटीत संपूर्ण वातावरण भारावून गेले आहे. सणाच्या निमित्ताने लोकांनी नव्या संकल्पांसह वर्षाची सुरुवात केली आहे. शोभायात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती नागपूरमध्ये आयोजित शोभायात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. या ठिकाणी सामूहिक रामरक्षा पठण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी गुढीपाडवा हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा सण असल्याचे सांगत नव्या वर्षात सकारात्मक संकल्प घेऊन पुढे जाण्याचे आवाहन केले. तसेच देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पारंपरिक पोशाखात सहभागी झालेल्या नागरिकांमुळे नागपूरमध्ये भगवामय वातावरण निर्माण झाले होते. ठाण्यातील शोभायात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरम्यान, ठाण्यातील शोभायात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला. कोपीनेश्वर मंदिरातून पालखी सोहळ्याची सुरुवात झाली असून यात आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि खासदार नरेश मस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाण्यातील रस्त्यांवर मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर आणि लेझीमच्या नादात शोभायात्रा रंगतदार झाली. डोंबिवलीत स्वागत यात्रा डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेत आधुनिकतेची झलक पाहायला मिळाली. महिला रायडर्स आणि सायकलस्वारांनी पारंपरिक वेशात सहभागी होत मोटरसायकलवर गुढी उभारत अनोख्या पद्धतीने सण साजरा केला. नव्या पिढीकडून परंपरेचे जतन करण्याचा हा अनोखा प्रयत्न असल्याचे चित्र दिसून आले. महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. तुळजाभवानी मंदिरात गुढी दरम्यान, तुळजाभवानी मंदिर येथेही गुढीपाडवा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. पहाटे आरती करून मंदिराच्या शिखरावर विधीवत गुढी उभारण्यात आली. मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा आणि वाकोाजी बुवा यांच्या उपस्थितीत देवीची विशेष पूजा करण्यात आली. तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवसानिमित्त भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली, ज्यामुळे संपूर्ण राज्यात सणाचा उत्साह अधिकच वाढला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



