
Pune Police Recruitment Shocking Incident With Girls: बेरोजगारीची झलक दाखवणारा एक धक्कादायक व्हिडीओ काही आठवड्यांपूर्वी समोर आला होता. पुण्यातील एका आयटी कंपनीमधील काही जागांसाठी मुलाखत देण्यास इच्छूक असलेल्या तरुण-तरुणींनी काही किलोमीटरची रांग लावल्याचं या व्हिडीओत दिसत होतं. असाच एक थक्क करणारा प्रकार आज म्हणजेच बुधवार, 19 मार्च रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयासमोर घडला. पुण्यात 531 कारागृह महिला पोलीस जागांसाठी भरती सुरु आहे. आज याच भरतीसाठी उत्सुक असलेल्या 3000 मुलींनी गर्दी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात गर्दी केली. या वेळी चेंगराचेंगरीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली.
नेमकं घडलं काय?
सकाळी पुण्यातील शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात जो प्रकार घडला यावरुन इच्छूक मुलींच्या पालकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या मुलींच्या रांगेच्या नियोजनात गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. गेटवर झालेल्या गर्दीमुळे लोखंडी गेट तुटून पडला आणि त्यावरून मुली आतमध्ये पळत सुटल्या यावेळी चेंगराचेंगरी आणि गर्दी झाली. अनेक मुलींच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या साऱ्या प्रकारामुळे पालक चांगलेच संतापले आहेत.
पालकांनी व्यक्त केला संताप
पोलीस व्हायचे स्वप्न घेऊन आलेले आपल्या मुलींचे डोळ्यासमोर होत असलेले हाल पाहून पालक हेलावून गेले. मोजक्या पोस्टसाठी हजारो मुली संघर्ष करत असल्याचं पाहून पालकांनी नियोजनावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करुन संताप व्यक्त केला. यावेळी काही पालकांची स्थानिक पोलिसांशी बाचाबाची देखील झाली. पवार नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. खरतर मुलींनी अनेक महिन्यांपासून या भरतीसाठी तयारी केली आहे. मैदानी चाचणीसाठी प्रचंड वेळ आणि मेहनत खर्ची केली आहे. ही भरती 2022-23 मधील पुणे कारागृह पोलीस भरती म्हणून रखडलेली आहे, असं मुलींच्या पालकांनी सांगितलं. या ठिकाणी एकूण 513 जागेसाठी ही रखडलेली भरती प्रक्रिया सुरु आहे. इतर पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तिपत्रेही देण्यात आल्याचं पालकांचं म्हणणं आहे. मात्र, पुणे कारागृह पोलीस भरतीचा अजूनही ठोस निर्णय होत नसल्याबद्दल उमेदवारांबरोबर त्यांच्या पालकांमध्येही नाराजी आहे.
नियोजनशून्यतेचा आरोप
दीर्घ प्रतिक्षेनंतर आता ही भरती प्रक्रिया पार पाडत असताना अशाप्रकारे नियोजनशून्यतेमुळे चेंगराचेंगरी सदृष्य परिस्थिती निर्माण होऊन या साऱ्या गोष्टीला गालबोट लागत असल्याचं पालकांनी म्हटलं आहे.. या पोलिसांच्या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे मैदानी चाचणीमध्ये आपली मेहनत तर व्यर्थ जाणार नाही ना अशी भावना विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसत आहे. येथे क्लिक करुन तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…
पोलिसांनी काय म्हटलं आहे?
दरम्यान, या साऱ्या प्रकारावर पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. “राज्यातील कारागृह पोलीस भरती प्रक्रिया आजपासून पुण्यात सुरू झाली आहे. आज सकाळी गेट उघडताना मोठ्या संख्येने भरतीसाठी आलेले उमेदवार त्यांच्यासोबत पालक आले त्यामुळे काहीसा गोंधळ या ठिकाणी झाला. मात्र कुठल्या ही प्रकाराची चेंगराचेंगरी झाली नसल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर सुरू असलेली प्रक्रिया आता सुरळीत सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण भरती प्रक्रियेवर नजर ठेवली आहे. तसंच स्पर्धकांसोबत येणाऱ्या पालकांसाठी पुणे पोलिसांनी जवळील शाळेत राहण्याची सोय केली आहे, याचा लाभ घ्यावा असं आवाहन सुद्धा पोलिसांनी केलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.