
Chandrkant Patil Phone Call Gautami Patil Video: पुण्यामध्ये मंगळवारी मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात झालेल्या अपघात प्रकरणामध्ये आता भाजपाचे मंत्री आणि स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घातलं आहे. हॉटेल विश्वाससमोरील सर्व्हिस रोडवर झालेल्या अपघातात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिल्यानंतर रिक्षाचलक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात आता चंद्रकांत पाटलांनी थेट पोलिसांना फोन लावला असून या प्रकरणामध्ये ‘गौतमी पाटीलला उचलायचंय की नाही?’ असा सवाल केला असून चंद्रकांत पाटलांच्या या फोन कॉलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
नेमका अपघात कुठे आणि कसा घडला?
गौतमी पाटीलच्या मालकीची एमएच 12 डब्ल्यू झेड 6589 या क्रमांकाच्या कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत धायरीमधील गारमळा येथील उज्वल दीप सोसायटीत राहणारा 44 वर्षीय रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. रिक्षाचालक प्रवासी घेण्यासाठी वडगाव बुद्रुक येथील हॉटेल विश्वाससमोरील सर्व्हिस रोडवर थांबले असताना, भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. याप्रकरणी रिक्षाचालक सामाजी मरगळे यांचे मित्र युवराज ज्ञानोबा साळवे (वय 32) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात चारचाकी चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत एकाला अटक केली.
गौतमी पाटीलला उचलायचंय की नाही?
या प्रकरणामध्ये दाद मागण्यासाठी जखमी रिक्षाचलक विठ्ठल मरगळेची मुलगी आणि नातेवाईक चंद्रकांत पाटलांकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी नातेवाईकांसमोरच पोलिसांना फोन लावून या प्रकरणाची माहिती घेऊन काही सूचना केल्या. “हा, त्या गौतमी पाटीलला उचलायचंय की नाही?” असा पहिला सवाल चंद्रकात पाटलांनी फोन कॉलवर पोलीस अधिकाऱ्याला विचारला.
त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी, “अरे पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? आता हा रिक्षावाला सिरीअर आहे. तुम्ही म्हणालात गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राइव्ह करत होतं की भूत ड्राइव्ह करत होतं? तो जो कोण ड्रायव्हर आहे त्याला पकडायला लागेल ना? पकडला? केस दाखल केली?” असं विचारलं. पोलिसांनी समोरुन सर्व घडामोडीची माहिती दिली. चंद्रकांत पाटलांनी हा फोन पुण्याच्या पोलीस उपायुक्तांना केल्याची माहिती मिळत आहे.
‘गौतमी पाटीला म्हणा की तू…’
पुढे बोलताना चंद्रकांत पाटलांनी, “बरं मग तो कुठे आहे आता? मग त्याची गाडी कुठे आहे? गाडी जप्त करुन टाका,” अशी सूचना पोलिसांना केली. “त्या गाडीची मालक गौतमी पाटील असेल तर तिला नोटीस द्या! त्या बिचाऱ्याची मुलगी समोर येऊ बसली आहे. तुम्ही काय करा, गौतमी पाटीला म्हणा की तू त्यांच्या उपचारांचा सर्व खर्च तरी कर. तुम्ही लक्ष घाला या प्रकरणात,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
कोथरूडचे आमदार पण भारीच आहेत. गौतमी पाटीलच्या गाडीने एकाला धडक दिली. यावेळी ती गाडीत नव्हती. पण कायद्याची अंमलबजावणी कडक झाली पाहिजे, यासाठी आग्रही असणारे दादा गजा मारणे आणि निलेश घायवळवर कारवाई करण्यासाठी तत्काळ फोन लावत नाहीत. कारण मतदानासाठी पोलिंग बूथवर ‘मॅन पॉवर’ लागते. 1/2 pic.twitter.com/Ta5dln2EQo
— Omkar Wable (@omkarasks) October 3, 2025
सहकार्य केलं जात नसल्याचा नातेवाईकांचा आरोप
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून सहकार्य केलं जात नसल्याची आरोप जखमी रिक्षाचालकाच्या मुलीने केला असून त्याचसंदर्भात दाद मागण्यासाठी ती चंद्रकांत पाटलांकडे गेली होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.