
What Does Chakarmani Means In Marathi: गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यात ‘चाकरमानी’ शब्दावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला निर्देश देण्यात आल्याने नवीन वाद सुरु झाला असून मागील अनेक दशकांपासून कोकणतील लोकांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘चाकरमानी’ शब्दाचा मूळ अर्थ काय? हा नवा वाद का सुरु झाला आहे? यावर कोकणातील लोकांचं म्हणणं काय आहे? हेच जाणून घेऊयात…
वादाला तोंड का फुटलं?
कोकणातून मुंबईसह अन्य शहरांत स्थलांतरित झालेल्या नागरिकांना वर्षानुवर्षे ‘चाकरमानी’ संबोधले जाते. मात्र हा शब्द अवमानकारक असल्याने तो हटवून त्याऐवजी ‘कोकणवासीय’ असा शब्द वापरा, असे निर्देश अजित पवार यांनी प्रशासनाला दिले. लवकरच याविषयीचे परिपत्रक काढण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
नेमकी ही बैठक झाली कुठे?
नुकतीच मुंबई–गोवा महामार्गाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत कोकणवासीयांच्या काही संघटनांनी ‘चाकरमानी’ हा शब्द अपमानकारक वाटत असल्याने सरकारी कागदपत्रे आणि शासकीय कामकाजात त्याऐवजी कोकणवासीय हा शब्द वापरण्याची आग्रही मागणी केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी या बैठकीत यापुढे ‘चाकरमानी’ शब्दाऐवजी ‘कोकणवासीय’ म्हणून संबोधण्याबाबतचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. लवकरच शक्य झाले तर गणेशोत्सवापूर्वीच याबाबतचे शासन परिपत्रक काढले जाणार आहे.
महायुतीमध्येच मतभेद?
चाकमानी न म्हटल्याने कोकणवासियांचा कोकणात जाण्याचा त्रास कमी होणार आहे का? असा सवाल शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. तर नितेश राणेंनी प्रेमाने काहीही म्हणा असं म्हटलंय. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कोकणातून मुंबईत आलेल्यांना चाकरमानी हाच शब्द योग्य असल्याचं मत व्यक्त केल्याने महायुतीमध्येच या विषयावरुन मतभेद असल्याचं दिसत आहे.
चाकरमानी शब्दाचा अर्थ काय? हा शब्द आला कुठून?
चाकरमानी म्हणजे वेगवेगळ्या खेड्या पाड्यातून शहरात येऊन नोकरी अथवा चाकरी करणारी व्यक्ती म्हणजे ‘चाकरमानी’ कोकणच्या खेड्यातील लोक मुंबईमध्ये येऊन पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मानाची चाकरी करतात त्या लोकांना कोकणात ‘चाकरमानी’ म्हणतात.
शब्द कसा तयार झाला?
चाकरमानी हा ‘चाकर’ (नोकरी करणारा) आणि ‘मानी’ (माणूस) या दोन मराठी शब्दांच्या संयोगाने बनलेला शब्द आहे. याचा अर्थ नोकरी करणारा किंवा दुसऱ्याच्या सेवेत असलेला व्यक्ती असा होतो, जो आपल्या उपजीविकेसाठी दुसऱ्याची सेवा करतो.
शहरात जाऊन मानाची चाकरी करणारा म्हणजे चाकरमानी, असंही म्हटलं जातं. अशा चाकरमानी लोकांचे जीवन घड्याळाच्या वेळेशी जुडलेले असते म्हणजे सगळे वेळच्या वेळी सकाळी उठणे, ट्रेन/बस वेळेवर पकडणे, कामात वेळेवर पोहचणे व निघणे, महिन्याच्या ठराविक तारखेला पगार घेणे व सुट्टीच्या दिवशी कुटुंब किंवा मित्रांसोबत वेळ घालवणे आणि ठराविक सणाला आपल्या गावी जाणे या गोष्टी ठरलेल्या असतात, असं क्वोरावरील एका उत्तरात म्हटलं आहे.
चाकरमानी शब्द बदलण्यास काही संघटनांचा आक्षेप
अनेक दशकांपासून कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील नागरिक कामाच्या, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये राहून उदरनिर्वाह करतात. त्यामुळे ‘चाकरमानी’ हा मराठी शब्द प्रामुख्याने कोकणातून शहरांमध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेल्या नागरिकांसाठी रूढ झाला.
मुंबईकरांचा आक्षेप
मुंबईतील सर्वसामान्य कोकणवासीयांनी अजित पवार यांच्या या मताबद्दल अक्षेप असल्याचं दिसतंय. पूर्वीपासून आम्हाला कोकणात गेल्यावर चाकरमानी या शब्दानेच कोकणातील लोक बोलत असायची हा शब्द खरंतर सन्मानाने उच्चारला जातो असं कोकणवासीयांचं मत आहे.
FAQ
हा वाद का आणि कसा सुरू झाला?
उत्तर: अजित पवार यांनी ‘चाकरमानी’ शब्द अपमानकारक असल्याचे मानून तो बदलण्याचे निर्देश दिले, ज्याला काही कोकणवासीय आणि महायुतीतील काही नेत्यांनी विरोध केला. कोकणवासीयांचे मत आहे की हा शब्द त्यांच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे, तर काही संघटनांना तो अपमानकारक वाटतो, यामुळे हा वाद सुरू झाला.
‘चाकरमानी’ शब्द कसा आणि का रूढ झाला?
उत्तर: कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील लोक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुणे यासारख्या शहरांत स्थलांतरित होतात. त्यांच्या जीवनशैलीत वेळेचे बंधन (जसे की सकाळी उठणे, ट्रेन/बस पकडणे, पगार, सणांसाठी गावी जाणे) असल्याने हा शब्द रूढ झाला. हा शब्द कोकणातून शहरात मानाची चाकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी वापरला जातो.
महायुतीत या मुद्द्यावर मतभेद का निर्माण झाले?
उत्तर: शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी ‘चाकरमानी’ शब्द बदलल्याने कोकणवासीयांचा त्रास कमी होणार का, असा सवाल उपस्थित केला. नितेश राणे यांनी प्रेमाने काहीही म्हटले तरी चालेल असे मत व्यक्त केले, तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ‘चाकरमानी’ हाच शब्द योग्य असल्याचे सांगितले. यामुळे महायुतीत मतभेद दिसून येत आहेत.
‘चाकरमानी’ शब्द बदलण्याच्या निर्णयाला कोणत्या संघटनांचा आक्षेप आहे?
उत्तर: कोकणातील काही संघटनांनी ‘चाकरमानी’ हा शब्द अपमानकारक असल्याचे सांगत त्याऐवजी ‘कोकणवासीय’ शब्द वापरण्याची मागणी केली. मात्र, मुंबईतील सर्वसामान्य कोकणवासीयांचे म्हणणे आहे की, हा शब्द सन्मानाने उच्चारला जातो आणि त्यांना याचा आक्षेप नाही.
कोकणवासीयांचे ‘चाकरमानी’ शब्दाबाबत काय मत आहे?
उत्तर: मुंबईतील कोकणवासीयांचे म्हणणे आहे की, ‘चाकरमानी’ हा शब्द कोकणात सन्मानाने वापरला जातो. हा शब्द त्यांच्या ओळखीचा आणि अभिमानाचा भाग आहे, आणि त्यांना तो बदलण्याबाबत आक्षेप आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.