
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील चिखलदरा येथील कॉफी बागेतून यावर्षी १५ टन कॉफीचे उत्पादन अपेक्षित आहे. स्थानिकांच्या दाव्यानुसार, हे महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादन केंद्र आहे. येथील अरेबिका जातीच्या कॉफीला बाजारात चांगली मागणी आहे. विदर्भातील उष्ण वातावरणापासून दिलासा मिळवण्यासाठी तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांनी चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध लावला. येथे कॉफीची लागवड शक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर कॉफीची झाडे लावली. वनविभागाच्या माहितीनुसार, सध्या सुमारे ६०० हेक्टर क्षेत्र कॉफीच्या झाडांनी व्यापले आहे. कॉफीची झाडे मोठ्या झाडांच्या सावलीत वाढतात, कारण त्यांना थेट सूर्यप्रकाश सहन होत नाही. सध्या आंबा, वड आणि इतर सदाहरित झाडांच्या खाली कॉफीची झाडे वाढत आहेत. ब्रिटीशकालीन ती झाडे आजही तशीच आहेत आणि या बागांमुळे स्थानिक आदिवासी युवकांना रोजगार मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात या कॉफीचा उल्लेख केला होता. या बागांची व्याप्ती वाढवून शासकीय मदत मिळाल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. सध्या कॉफीच्या झाडांना लाल रंगाची फळे लागली आहेत, जी पर्यटकांना आकर्षित करत आहेत. ही बाग आता पर्यटकांचे एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र बनली आहे. उत्पादक सुनील भालेराव यांच्या मते, महाराष्ट्रात केवळ चिखलदऱ्यात कॉफीचे उत्पादन होते, याची अनेकांना माहिती नाही. सरकारी यंत्रणांचेही या बागांकडे दुर्लक्ष होत आहे. ब्रिटीश गेल्यानंतर नवीन कॉफीच्या बागा लावण्याचा प्रयत्न झाला नाही. भालेराव यांनी जुन्या बागांची संख्या वाढवण्याची आणि कॉफी फळापासून भुकटी (पावडर) तयार करण्यासाठी शास्त्रोक्त प्रक्रिया केंद्र उभारण्याची गरज व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



