
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अखेर मंत्रिपद देण्यात येणार आहे. मुंबईतील राजभवनात मंगळवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 50 जणांच्या उपस्थितीत
.
महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज होते. त्यांनी स्वतः अनेक वेळा आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करत केली होती. तसेच पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली होती. मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये कमबॅक करतील अशी चर्चा रंगली होती. यानंतर आता छगन भुजबळ यांचे पक्षाकडून राजकीय पुनर्वसन होताना दिसत आहे. राज्याच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचा महत्त्वाचा चेहरा म्हणून छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी दिली जात असल्याची चर्चा आहे.
धनंजय मुंडेंचे खाते मिळण्याची शक्यता
विशेष म्हणजे, छगन भुजबळ यांच्याकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा खाते सोपवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपामुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले होते. धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मीक कराडसह संपूर्ण टोळी गजाआड गेली. संतोष देशमुख यांना मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता अन्न व नागरी पुरवठा खाते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
अखेरीस भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार, यावरून राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली होती. त्याच दरम्यान, छगन भुजबळ यांचे नाव पुन्हा एकदा जोरदारपणे चर्चेत आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून रिक्त झालेल्या मंत्रिपदावर त्यांना संधी मिळावी, अशी मागणी पक्षांतर्गत पातळीवरही होत होती. मात्र, अजित पवारांनी निर्णय तळ्यातमळ्यात ठेवला होता. अखेरीस आता छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
भुजबळांची नाराजी दूर करण्यात येणार?
छगन भुजबळ हे राज्याच्या राजकारणातील मातब्बर आणि अनुभवी नेते आहेत. मात्र त्यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली नव्हती. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी अजित पवारांवरही टीका केल्याचे दिसून आले. भुजबळांची हीच नाराजी आता दूर करण्यात येणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.