
Sanjay Raut On Not Inviting Kolhapur Sambhaji Maharaj Sahu Maharaj: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीदिनानिमित्त रायगडावर केंद्रीय गृहमंत्री आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील निमंत्रितांच्या यादीवरुन आक्षेप घेतला आहे. संभाजी राजेंना तसेच शाहू महाराजांना या कार्यक्रमाला का आमंत्रित करण्यात आलं नव्हतं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. तुमच्या पक्षात प्रवेश केला तरच त्यांना आमंत्रित करणार का? असा थेट सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. संजय राऊत यांनी साताऱ्याची गादी आणि कोल्हापूरच्या गादीत भेदभाव केल्याचा आरोप करताना ‘अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण पाहून छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असेल,” अशी घणाघाती टीकाही केली आहे.
तुम्ही दोन्ही गाद्यांच्या वंशजांना निमंत्रण द्यायला पाहिजे होते
अमित शाहांच्या उपस्थितीत रायगड किल्ल्यावर पार पडलेल्या कार्यक्रमाबद्दल बोलताना संभाजी राजेंना निमंत्रित करण्यात आलं नसल्याच्या मुद्द्यावरुन पत्रकारांसमोर राऊतांनी संताप व्यक्त केला. “तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम रायगडावर करत आहात तर सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या छत्रपतींच्या आहेत. तर तुम्ही दोन्ही गाद्यांच्या वंशजांना निमंत्रण द्यायला पाहिजे होते,” असं राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> ‘शिवाजी महाराजांना अरे-तुरे करायला अमित शाहांची जीभ धजावते कशी?’ राऊतांचा सवाल; म्हणाले, ‘मला गाढव म्हणून…’
छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असेल
तसेच, “उदयनराजे भोसले हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत म्हणून त्यांना बोलवायचं. छत्रपती शिवाजी महाराज हे भाजपामध्ये नव्हते. तुम्ही या छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रित केलेलं नाही. तुम्ही कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजांना आमंत्रित केले नाही. तुम्ही जे भाजपचे हाजीअजी करत आहेत त्यांना निमंत्रण दिलं आहे,” असं म्हणत राऊतांनी भाजपावर निशाणा साधला. “छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असेल अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण पाहून,” असा टोलाही राऊतांनी लगावला.
नक्की वाचा >> ‘गुजरातच्या नेत्यांना…’; अमित शाहांनी औरंगजेबच्या कबरीचा केलेला ‘तो’ उल्लेख ऐकून राऊतांचा संतप्त सवाल
हे कोणते धोरण आहे तुमचे?
“जे तुमच्या पक्षात गेले त्यांना तुम्ही बोलावलं मात्र तुम्ही शाहू महाराजांना सन्मानाने बोलावलं पाहिजे होतं. तुम्ही छत्रपती संभाजी यांना सन्मानाने बोलावलं हवं होतं. त्यांनी त्यासाठी तुमच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे का? हे कोणते धोरण आहे तुमचे?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. अमित शाहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या मुद्द्यावरुनही राऊतांनी कठोर शब्दांमध्ये यावेळी टीका केल्याचं पाहायला मिळालं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.