
जनावरांना अमानुष वागणूक देत दाटीवाटीने वाहनांत कोंबून अवैधरित्या वाहतूक केल्याचा प्रकार जकातवाडी (ता. सातारा) येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अक्षय मोहन गायकवाड (वय ३३, रा. आसनगाव, ता. सातारा) आणि कृष्णात मगूट पवार (वय ५०, रा. लावंघर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस हवालदार अजित निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १८ रोजी सायंकाळी ७ वाजल्यानंतर संबंधित संशयित दोन मॅक्स ट्रकमधून चार गायी व चार वासरांना दाटीवाटीने उभे करून वाहतूक करत होते. जनावरांना हालचाल करता येणार नाही अशा पद्धतीने वाहनांच्या हौद्यात दोरीने बांधून ठेवण्यात आले होते. तसेच परवानगीपेक्षा अधिक जनावरांची वाहतूक केल्याचेही निदर्शनास आले. या प्रकारामुळे जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहनांसह जनावरांची सुटका केली असून दोघांविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा व संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार अजित निकम करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



