
जलतरण तलावात महाकुंभातील पवित्र जल सोडून स्नान करण्यात आले.
.
प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यातील त्रिवेणी संगमाचे पवित्र जल मालपाणी हेल्थ क्लबच्या जलतरण तलावात अर्पण करण्यात आले. त्याद्वारे अनेकांना कुंभमेळ्याच्या या पावन पर्व काळात स्नान घडवून आणण्याची किमया साधली गेली आहे. या कल्पकतेचे स्वागत होत आहे. मालपाणी हेल्थ क्लबचे सभासद मिलिंद सराफ हे नुकतेच प्रयागराज येथे त्रिवेणी संगमात महाकुंभ स्नान करून संगमनेरला परतले. परत येताना त्यांनी आठवणीने तेथील गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यांच्या संगमाचे पवित्र जल मंगल कलशात भरून आणले. मंगळवारी (१८ फेब्रुवारी) सकाळी क्लबच्या जलतरण तलावात मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांच्या हस्ते मंगल कलशातील पवित्र जल अत्यंत उत्साहाच्या वातावरणात व जयघोषात अर्पण करण्यात आले. त्यामुळे जलतरण तलावातील पाणीही महाअमृत कुंभमय झाले. तब्बल १४४ वर्षांनी आलेला हा पावन योग असल्याने या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जे कोणी प्रत्यक्ष प्रयागराज येथे जाऊ शकले नाहीत, त्यांना येथील स्नानाने महाकुंभ स्नानांचे पुण्य प्राप्त झाले. जलतरणासाठी आलेल्या सर्वांनी नेहमीपेक्षा आजच्या पोहण्याचा आनंद आणि अध्यात्मिक समाधान मिळाल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली. मिलिंद सराफ यांनी आठवणीने सर्वांसाठी ही पर्वणी उपलब्ध करून दिल्याबद्दल मालपाणी यांनी त्यांना पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले. यावेळी क्लबचे सभासद रामेश्वर भंडारी, गुरू बाप्ते, नवनीत कोठारी, नेहमीचंद निहलाणी, बंटी निहलाणी, विक्रम पडतानी, राजेंद्र गुंजाळ, कैलास हासे आदी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.