
सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारातील तरुणाच्या खूनाचे गुढ उकलले असून लोणार तालुक्यातील वढव येथे अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुण मुलाचा त्याच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने २५ हजार रुपयांमध्ये सुपारी देऊन खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका महिलेसह तिघांना शुक्रवारी ता. १० अटक केली आहे. सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारातील नाल्यात दोन दिवसांपुर्वी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. तरुणाचा चेहरा दगडाने ठेचला होता. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात ता. ८ एप्रील रोजी खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, मयुर रसाळ यांनी तपासासाठी गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक स्थापन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सेनगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक दिलीप मोरे, जमादार नलवार, संदीप जाधव, विकी कुंदनानी, धनंजय क्षिरसागर, पांडूरंग राठोड, रवी स्वामी, पाईकराव, इंगोले, महिला पोलिस कर्मचारी सुरेखा अत्राम, सायबर सेसचे दत्ता नागरे, इरफान पठाण यांच्या पथकाने मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी परिसरात बेपत्ता व्यक्तीचा शोध घेतला. त्यानंतर सदर मृतदेह लोणार तालुक्यातील वढव येथील सचिन राजगुरु (२४) याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या पथकाने दोन दिवस त्याच भागात माहिती घेतली असता मयत सचिन याची आई लिलाबाई हिचे गावातील रामदास तनपुरे (६५) याच्या सोबत अनैतिक संबंध होते. सचिन हा पुणे येथे कामाला असल्याने त्याची माहिती त्याला मिळाली नाही. मात्र काही दिवसांपुर्वी तो परत गावी आल्याने त्याला या संबंधाची कुणकुण लागली. त्यामुळे त्याला संपविण्याचा कट लिलाबाई व रामदास यांनी रचला होता. यासाठी त्यांनी नरेश पवार याला सचिन याचा खून करण्यासाठी २५ हजार रुपये देण्याचे कबुल केले. त्यारून नरेश व रामदास यांनी सचिन यास पाहुण्यांकडे जाऊन येऊ असे सांगत सोबत घेतले अन त्याला साखरा येथे भरपेट दारू पाजली. त्यानंतर उमरदरा शिवारात त्याचा दगडाने खून करून मृतदेह फेकून दिल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांनाही अटक केली असून त्यांनी अनैतिक सबंधात अडथळा येत असल्याने सचिन याचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






