
Jalna Crime News: जालनात्यातील एका सात वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याची घटनेने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता एक महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. जालन्यातील भोकरदन येथील गणपती इंग्लिश स्कुलच्या आदिवासी निवासी वस्तीगृहात राहणाऱ्या आणि दुसरीत शिकणाऱ्या 7 वर्षाच्या विद्यार्थ्याचा त्याच्याच हॉस्टेलमधील दोन अल्पवयीन बालकांनी दोरीने गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. या अल्पवयीन आरोपींनी मोबाईलवर क्राईम स्टोरीज पाहून हा खून केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी खून करणाऱ्या अल्पवयीन दोन बालकांना ताब्यात घेत त्यांची बालसुधारगृहात रवानगी केलीय.
जालन्यातील भोकरदनच्या याच गणपती विद्यालयात दुसरी च्या वर्गात शिकणाऱ्या 7 वर्षाच्या बालवीर पवारचा रात्रीच्या वेळी दोरीने गळा आवळून खून करण्यात आलाय. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनं भोकरदन शहर आणि तालुका हादरून गेला होता. दोन दिवसांपूर्वी बालवीरचा हॉस्टेलच्या परीसरात मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आणि पोलीस तपास सुरू झाला. बालवीरच्या हत्येप्रकरणी तपासा दरम्यान पोलिसांनी याच शाळेच्या हॉस्टेलमधून एक 14 आणि दुसऱ्या 8 वर्षाच्या अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतलं आणि या दोन्हीही मुलांनी बालवीरचा दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली
पोलिसांनी दोन अल्पवयीन बालकांना या हत्येप्रकरणी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केल्यानंतर पोलीसही हादरले आहेत. अल्पवयीन दोन्हीही आरोपींचे बालवीरसोबत शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यावरून भांडण होत होतं. तसेच हॉस्टेलमध्ये झोपण्यासाठी दोन कप्प्यांचे बेड असल्यानं वर झोपलेल्या बालकाकडून पेन्सिल अथवा पेन सतत खाली पडण्यावरून देखील त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे या दोन अल्पवयीन आरोपींनी बालवीरचा दोरीने गळा आवळून खून केला. हा खून केल्यानंतर अल्पवयीन आरोपी रात्रभर बालवीरच्या पार्थिवावर ब्लॅंकेट टाकून या पार्थिवा शेजारी देखील बसून राहिल्याचं पोलीस तपासात समोर आलं. विशेष म्हणजे या तपासा दरम्यान या अल्पवयीन आरोपींनी बालवीरचा खून मोबाईलमध्ये क्राईम स्टोरी पाहून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. त्यामुळे पालकांनी आपली लहान मुलं मोबाईलमध्ये काय बघतात याकडे लक्ष द्यावं असं आवाहन पोलिसांनी केलंय
भोकरदनमध्ये 2 रीच्या वर्गात शिकणाऱ्या बालविरच्या हत्येनं सध्या भोकरदन शहर सुन्न झालंय. या खुनाच्या घटनेने बालविरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. शाळा अथवा हॉस्टेलमध्ये लहान मुलांच्या भांडणांच्या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे या घटनेने अधोरेखीत केलंय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.