
अमरावती जिल्हा परिषदेत सध्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली आहे. प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार यांनी सर्व विभागांना त्यांच्या मागण्या सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प सादर करून त्याला मंजुरी मिळवणे बंधनकारक असल्याने प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. या तयारीचा भाग म्हणून, गुरुवार, १२ मार्च रोजी जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांच्या दालनात दुपारी १ वाजता ही बैठक सुरू होईल. शिल्पा पवार यांनी या बैठकीसाठी संबंधित विभागांना पत्रव्यवहार केला आहे. जिल्हा परिषदेला केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारा निधी दरवर्षी १५ मार्चपर्यंत मिळतो. त्यामुळे या निधीच्या वितरणाचे नियोजन त्यानंतरच्या आठवड्यात केले जाते. परिणामी, जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा २० मार्चनंतरच होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम, समाज कल्याण, दिव्यांग कल्याण, महिला व बालविकास, कृषी व पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन, पंचायत आणि शिक्षण विभाग असे महत्त्वाचे विभाग आहेत. या विभागांमार्फत विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. यावर्षी कोणत्या आणि किती योजना राबविल्या जाणार, याचा तपशील या अर्थसंकल्पातून स्पष्ट होईल. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने प्रत्येक विभागाकडून सन २०२६-२७ साठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी नोंदवून घेण्यास सुरुवात केली आहे. १५ मार्चपर्यंत प्राप्त होणाऱ्या अनुदानातून करावयाच्या कामांची तयारीही सुरू आहे. ही सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतरच अर्थसंकल्प सादर केला जाईल. १२ मार्चच्या बैठकीत चालू वर्षाचा जमा-खर्च आणि नवीन वर्षाच्या मागणीचा ताळमेळ बसवला जाईल, तसेच येत्या काळात प्राप्त होणाऱ्या रकमेच्या विनियोगाचे नियोजन केले जाईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



