
Eknath Shinde on ZP Panchayat Election Result: जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीने विजयाची हॅटट्रिक करून विक्रमच केला आहे. सुरुवातीला नगरपरिषद नगरपंचायती, त्यानंतर महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीनही निवडणुकांत दणदणीत विजयी करून महायुतीचा भगवा दिमाखात फडकवला आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या निवडणुकीत जनतेने शिवसेनेला सुद्धा भरघोस मते दिली आणि आमच्यावरच विश्वास आणखी वाढवला. आम्ही त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवू असं त्यांनी म्हटलं आहे.
“महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेला भरघोस मते दिल्याने ग्रामीण भागातही आमचा पाया आता अधिक मजबूत होत चालला आहे हे दिसते. रायगड, रत्नागिरीच्या विजयामुळे कोकणातील जनता खऱ्या शिवसेनेच्या पाठीशीच आहे हे सिद्ध झाले. वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेना घराघरात पोहोचवण्याचा मंत्र दिला होता आणि आज त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना दिसते आहे, याप्रसंगी त्यांची ही खूप आठवण येते आहे, असे सांगून उप मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विशेषतः खेड्यापाड्यातल्या आमच्या लाडक्या भगिनींचे मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी त्यांच्या लाडक्या भावाला भरभरून प्रेम दिले,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
‘दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून महायुतीची विजयाची परंपरा सुरूच आहे आणि पुढेही हे प्रेम कायम राहील असा मला विश्वास वाटतो. गेल्या तीन वर्षांपासून महायुतीच्या सरकारने शहरी किंवा ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवणारे निर्णय घेतले. मग ते रस्ते असो, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा असो, सिंचन प्रकल्पांना दिलेली गती असो किंवा शिक्षणाचा वाढवलेला दर्जा असो. महिलांना आत्मनिर्भर करून स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महायुती सरकारने विविध योजना राबवल्या त्याचा फायदा देखील ग्रामीण भागातील महिलांना मिळाला. गेल्या तीन वर्ष ग्रामपंचायतींना सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार दोघांनी अनेक पावले उचलली, केवळ निधीच दिला नाही तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उत्तम प्रशासन देण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याचाच परिणाम म्हणून खेड्यापाड्यातल्या बंधू भगिनींनी आमच्यावर विश्वास टाकला,” असंही उपमुख्यमंत्री म्हणाले.
आज महायुतीचा विजय होत असताना मला दिवंगत अजितदादा यांची आवर्जून आठवण येते. महायुतीचा विजय आम्ही त्यांच्याबरोबर नक्कीच साजरा केला असता असे सांगून उप मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या यशामागे कार्यकर्त्यांची मेहनत गावागावात केलेला काम आणि लोकांच्या प्रश्नासाठी घेतलेली भूमिका आहे. जनतेने दिलेल्या विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही आणि जिल्हा परिषदांच्या माध्यमातून ग्रामीण विकास शेतकरी महिला तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अधिक जबाबदारीने काम करू असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



