
मुंबई10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचला. विशेषतः त्याचा ‘झापुक झुपूक’ हा डायलॉग तर एवढा लोकप्रिय झाला की, याच नावावर त्याची मुख्य भूमिका असलेला एक मराठी सिनेमाही केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली प्रदर्शित झाला. मात्र, आता हाच डायलॉग सूरजचा आहे की नाही, यावरून एक नवा वाद उफाळून आला आहे. ‘झापुक झुपूक’ हा शब्द आपला आहे आणि तो अनेक वर्षांपासून वापरत असल्याचा दावा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सागर शिंदे नावाच्या एका इन्फ्लुएन्सरने केला आहे. तसेच हा शब्द कायदेशीररीत्या नोंदवलेलाही असल्याचा दावाही सागरने केला आहे.
सूरज चव्हाणला ज्या डायलॉगमुळे ओळख मिळाली, तो मुळात सुरजचा नसल्याचा दावा सागर शिंदेने केला आहे. याबाबत सागरने त्याच्या रावडी नेता नावाच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच यासंदर्भात आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचाही दावा सागर शिंदेने केला आहे.
नेमके काय म्हणाला सागर शिंदे?
झापुक झुपूक हा डायलॉग मला सुचलेला असल्याचे सागर शिंदे याने त्याच्या रावडी नेता नावाच्या यूट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओत म्हटले आहे. डीजे व साऊंड सिस्टीम या गोष्टींची मला आवड आहे. तर कुठे डीजे वाजत असेल, तर मी तो बघायला जायचो. तेव्हा मी म्हणायचो हा साऊंड झापुक झुपूक वाजतोय. लहानपणापासूनच मी हा डायलॉग म्हणायला सुरुवात केली होती, असेही तो म्हणाला.
झापुक झुपूक पहिल्यांदा 2023 लोकांनी उचलून धरला
झापुक झुपूक हा शब्द मी पहिल्यांदा 2022 मध्ये बोललो. 2022 ला मी दहीहंडीचा एक पर्सनल व्हिडीओ केला होता. तेव्हा साउंड सिस्टीमबाबत बोलताना मी झापुक झुपूक हा डायलॉग बोललो होता. त्यावेळी 2022 मधला व्हिडीओ फारसा चालला नव्हता. 2023 ला मी तोच व्हिडीओ रिक्रिएट केला. त्यामध्ये मी झापुक झुपूक हा शब्द वापरला. तो व्हिडीओ खूप व्हायरल झाला. लोकांनी झापुक झुपूक हा डायलॉग त्यावेळी डोक्यावर घेतला होता. मला अजूनही आठवतंय की, तो व्हिडीओ मी अपलोड केलेला 1 सप्टेंबर 2023 मध्ये. लोकांनी डायलॉग खूप उचलून धरला, असा दावा सागरने आपल्या व्हिडिओत केला आहे. काही डीजेनी माझे डायलॉग वापरायला सुरुवात केली. माझे डायलॉग वापरुन रिमिक्स गाणी बनवली. दिलात झापुक झुपूक वाजतंय हे गाणे ज्या व्यक्तीने बनवले, त्याने मला क्रेडीट दिलेले नाही. माझ्या परवानगीशिवाय त्याने हे गाणे तयार केले, असे तो म्हणाला.
माझा व्हिडिओ पाहून त्याने मला फॉलो केले
सागर शिंदे पुढे म्हणाला की, जून 2024 मध्ये सूरज चव्हाणने एका व्हिडीओमध्ये माझा झापुक झुपूक हा डायलॉग वापरला. तिथे मी त्याच्यावर आक्षेप घेऊ शकलो असतो. पण, जे डीजे होते, त्यांनी माझा फोटो लावला होता. त्यामुळे मला त्याचे क्रेडिट मिळत होते. तोपर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. सूरजने माझा डायलॉग त्याच्या व्हिडीओमध्ये वापरला, तेव्हासुद्धा मला काही प्रॉब्लेम नव्हता. मला प्रॉब्लेम कुठे झाला, तर जेव्हा सूरज बिग बॉसमध्ये आला. जेव्हा त्याची ओळख करून दिली जात होती, त्यावेळी सूरजने ‘झापुक झुपूक’ हा शब्द वापरला. तो बिग बॉसमध्ये असे सांगत होता की, मला हा डायलॉग अचानक सुचला. पण, त्याला माहीत होते की, हा माझा डायलॉग आहे. जूनमध्ये त्याने मला फॉलोसुद्ध केले होते. याचा अर्थ असा होतो की, त्याने माझा व्हिडीओ पाहिला आणि त्यानंतर त्याने मला फॉलो केले.
सूरज मला क्रेडीट देऊ शकला असता
सागर शिंदे म्हणाला, बिग बॉसमध्ये त्याने जवळजवळ सगळ्या एपिसोडमध्ये हा डायलॉग म्हटलेला आहे. जेव्हा बिग बॉसमध्ये पत्रकार परिषदेत घेतली तेव्हासुद्धा सूरजने असे म्हटले की, मला हा डायलॉग अचानक सुचला. तो म्हणू शकला असता की, हा डायलॉग मी एका मुलाच्या व्हिडीओमध्ये बघितला आणि तो मी बोललो होता. तो क्रेडिट देऊ शकला असता, कमीत कमी खरे तरी बोलला पाहिजा होता, पण त्याने सांगितले की, मी असाच बसलेलो आणि मला सुचला. त्यानंतर तो बिग बॉस जिंकला, त्यानंतर केदार शिंदेंनी घोषणा केल्याप्रमाणे त्याचा सिनेमाही प्रदर्शित झाला.
माझे नुकसान करून सूरज चव्हाण पुढे जातोय
आता केदार शिंदेंनी ‘झापुक झुपूक’ हा सिनेमा प्रदर्शित केला आणि त्यामध्ये त्यांनी सूरजला हिरो म्हणून घेतले. त्यामुळे सगळ्यांना हे वाटायला लागलंय की, हा डायलॉग सूरजने आणला आहे, तो त्याचाच डायलॉग आहे. पण, तो डायलॉग माझा आहे. त्याची मी नोंदणी केलेली आहे. आता मी जर रजिस्ट्रेशन केले आहे. तर दुसरे कुणीच तो डायलॉग वापरू शकत नाही. आता काहींचे असे म्हणणे असेल की, फक्त एक शब्द आहे, वापरला तर काय फरक पडतो. पण, मी पण तुमचाच माणूस आहे ना. माझे नुकसान करुन तो पुढे जातोय, हे चुकीचे आहे. सामान्य लोकांना कळणार नाही की, माझे नेमके नुकसान काय होतंय, असेही सागर शिंदे म्हणाला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited