
Ketaki Chitale Education: गेली अनेक दिवस महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अपमानावरुन वाद सुरु आहे. मी मराठी बोलणारच नाही असे म्हणणाऱ्यांना त्यांच्या भाषेत समज दिली जातेय. ज्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या वादात आता अभिनेत्री केतकी चितळेने उडी घेतलीय. वादग्रस्त वक्तव्यांमुळे केतकीला आतापर्यंत अनेकदा कायदेशीर कारवाई, अटक आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय. आता तिने ठाकरेंच्या शिक्षणावरुन टीका करत नवा वाद ओढवून घेतलाय. काय आहे नेमका हा वाद? ठाकरेंवर शाळेवरुन टीका करणाऱ्या केतकीचं शिक्षण किती झालंय? सविस्तर जाणून घेऊया.
कुठून सुरु झाला वाद?
महाराष्ट्रात सुरु असलेल्या मराठी-हिंदी वादात केतकीनं उडी घेतली. “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची नातवंडं एका कॅथलिक मिशनरी शाळेमध्ये का जातात? असा प्रश्न केतकीने उपस्थित केला. त्या ठिकाणी प्रार्थनासभेमध्ये आरती, पसायदान म्हटलं जात नाही. तिथे बिबलीकल हिम्स (बायबलमधील प्रार्थना) म्हटल्या जातात. तिथे त्यांना का शिकवलं जातंय?” असा सवाल केतकीने विचारला. तसेच ठाकरेंच्या नातवंडांना मिशनरी शाळेत शिकवलं जातं हे चालतं. मात्र “तुम्हाला अक्कल सांगत फिरणार ते की, मराठीमध्ये बोलणं किती गरजेचं आहे, अनिवार्य आहे. मराठी किती महत्त्वपूर्ण आहे सांगणार आणि स्वत:ची पोरं मिशनरी शाळेत शिकणार,” असा टोला केतकीने लगावला. यानंतर तिच्यावर टीका होऊ लागली.
केतकी चितळेचं शिक्षण
केतकी चितळेने पुण्यातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर पुण्यातूनच तिने आपले महाविद्यालयीन शिक्षणदेखील पूर्ण केले आहे. केतकीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केली असल्याची माहिती उपलब्ध आहे. तिने कोणत्या विशिष्ट शाळेत किंवा महाविद्यालयात शिक्षण घेतले, तसेच त्यांनी कितवीपर्यंत शिक्षण घेतले याबाबत तपशीलवार माहिती उपलब्ध नाही. केतकी चितळेला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती. वयाच्या सहाव्या वर्षी तिने नृत्याच्या कार्यक्रमात पहिले पारितोषिक मिळवले होते. महाविद्यालयात असताना ती कोरिओग्राफी शिकवत असे. कॉलेजच्या डान्स ग्रुप्सना मार्गदर्शन करत असे, अशी माहिती समोर आली आहे.
केतकीशी संबंधित आतापर्यंतचे वाद
शरद पवारांवरील वक्तव्य (2022)
केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केली. ज्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल झाला आणि तिला अटकही झाली. या प्रकरणामुळे ती मोठ्या वादात सापडली.
मराठी भाषा वाद (2025)
तिने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मागणीवर प्रश्न उपस्थित करत, “मराठी न बोलल्याने भोकं पडतायत का?” असे उपरोधिक विधान केले. यामुळे मराठी भाषकांमध्ये संतापाची लाट उसळली.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत टिप्पणी
केतकीने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवप्रेमी नाराज झाले आणि तिच्यावर टीका झाली. तसेच, स्टँडअप कॉमेडियनच्या वादग्रस्त वक्तव्यावर तिची प्रतिक्रिया देखील वादात सापडली.
एपिलेप्सी आणि इतर वाद
केतकीने तिच्या एपिलेप्सी आजाराबाबत माहिती शेअर केली, पण याच आजारामुळे तिला मालिकेतून काढल्याचा आरोप तिने केला. तसेच, तिच्या हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या समर्थनामुळेही ती ट्रोल झाली.
जातीय आणि सामाजिक मुद्दे
केतकीने ब्राह्मण ऐक्य परिषदेत ॲट्रॉसिटी कायद्याविरोधात वक्तव्य केले, ज्यामुळे दलित आणि मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आणि तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.