
Eknath Shinde On Uddhav Raj Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ठाकरे बंधुंच्या संभाव्य युतीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिंदीविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाष्य केलं आहे. 5 जुलै रोजी राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्रितरित्या मुंबईत मोर्चा काढणार आहेत. राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी मोर्चाची घोषणा केल्यानंतर त्यांनी संजय राऊतांशी चर्चा करुन वेगळा मोर्चा काढण्याऐवजी संयुक्त मोर्चा काढण्याची सूचना केली आणि ती उद्धव यांनी राऊतांच्या माध्यमातून स्वीकारली. याच साऱ्या घडामोडीवरुन शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
शिंदेंचा खोचक सल्ला
ठाकरे बंधू एकत्रपणे मोर्चा काढणार, राज आणि उद्धव यांनी संवाद साधला असा संदर्भ देत पत्रकारांनी नागपूरमध्ये शिंदेंना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावताना, “किती उतावीळ झाले. किती अगतिक झाले. ही वेळ का आली? ज्या पक्षाला तुम्ही संपलेला पक्ष म्हणत होते, ज्या पक्षाला तुम्ही कस्पटा समान समजत होते, त्या पक्षाबद्दल युती करा, युती करा, असे म्हणण्याची पाळी का आली? याचा आत्मचिंतन करा,” असा खोचक सल्ला शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिला आहे. साधारण दीड वर्षापूर्वी आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधताना मनसेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा मनसेचा उल्लेख ‘संपलेला पक्ष’ असा केला होता. याचीच आठवण शिंदेंनी आपल्या विधानातून करुन दिली.
ती काही लोकशाही होती का?
5 तारखेला आयोजित केलेल्या मोर्चाबद्दल बोलताना शिंदेनी मोर्चाबद्दल आम्हाला कुठलाही आक्षेप नाही असं स्पष्ट केलं आहे. “लोकशाहीमध्ये कोणीही आंदोलन करू शकतो, कोणी कोणत्याही पक्षासोबत जाऊ शकतो. 2019 मध्ये आम्ही पाहिलं, ज्या पक्षासोबत लोकांनी तुम्हाला मतदान केलं त्या पक्षाच्या पाठीशी तुम्ही खंजीर खुपसलं आणि काँग्रेससोबत घरोबा केला. हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे आणि त्याचं फळही त्यांना भेटलं आहे. मोर्चाबद्दल आम्हाला कुठलाही आक्षेप नाही. लोकशाहीत कोणीही कोणत्याही पक्षासोबत युती करू शकतो. आमच्या सरकारमध्ये लोकशाही आहे. त्या सरकारच्या काळात आम्ही पाहिला आहे पत्रकारांना तुरुंगात टाकण्यात आले ती काही लोकशाही होती का?” असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला.
नक्की वाचा >> हिंदी भाषा धोरणासाठी शिंदेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं दोषी; म्हणाले, ‘मी राज ठाकरेंशी…’
आमच्यात इगो नाही
“आम्हाला, मुख्यमंत्र्यांना कुठलाही इगो नाही. चर्चेतून प्रश्न सुटतात. आम्हाला इगो नाही आडमुठेपणाच्या धोरणाची भूमिका आम्ही घेतलेली नाही. चर्चा सुरू झाल्यानंतर आमच्या सरकारने अनिवार्य शब्द काढून टाकला. त्यामुळे आता मराठी सक्तीची आहे हिंदी सक्तीची नाही,” असंही शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.