
Raj Thackeray Uddhav Thackeray Letter to Election Commisison: राज्यात सध्या नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत असून, यानिमित्ताने प्रचाराचा धुरळा उडत आहे. 2 डिसेंबरला मतदान होणार असून, 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीच्या आधी निवडणुका घेण्याचे आदेश दिले असल्याने मुंबईसर इतर महापालिकांच्या निवडणुकाही जाहीर होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मतदार यादीतील घोळ मिटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊन दाखवाच असा इशारा दिला आहे. त्यातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी खरमरीत पत्र लिहिलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपले आक्षेप नोंदवले आणि राज, उद्धव ठाकरेंचं पत्रही आयोगाला दिलं आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाटी प्रभाग निहाय मतदारयादी विभाजनातील गंभीर त्रुटी व गोंधळ दूर करुन निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
“निवडणूक आयोगाची मतदार याद्यांमध्ये गोंधळ कायम ठेवण्याची, आणि ते कधीही न निस्तरता, ते गोंधळ अधिक गुंतागुतीचे कसे होतील या बाबतीतलं जे सातत्य आहे त्याचं अभिनंदन करावं का खेद व्यक्त करावा हेच कळत नाही. असो पण पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने मतदार यादीशी संबंधित घोळ तसाच ठेवला हे परत सिद्ध झालं,” असा टोलाही ठाकरे बंधूंनी लगावला आहे. पत्रात त्यांनी एकूण सहा घोळ दाखवून दिले आहेत.
राज आणि उद्धव ठाकरेंनी दाखवलेल्या 6 चुका
1) निवडणूक आयोगाने शेवटची मतदार यादी ही ३०/१०/२०२४ रोजी प्रकाशित केली. त्यानंतर नवीन यादी प्रकाशित झाली नाही. निवडणूक आयोगाच्याच नियमाप्रमाणे दर वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवीन यादी प्रसिद्ध होते आणि त्यानंतर दर तीन महिन्याला सुधारित यादी प्रसिद्ध होते. या वर्षात असं काही झालंच नाही. का? हे हेतुपुरस्सर होतं असं म्हणलं तर निवडणूक आयोगाला लगेच राग येतो. पणजर ते हेतुपुरस्सर नसेल तर मग कारण काय ?
2) बरं तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर नवीन मतदार नोंदणी, वगळली गेलेली नावं आणि बदल यासह जे प्रसिद्ध केलं आहेत ती फक्त औपचारिकता म्हणून केलं आहेत असं म्हणायला पूर्ण वाव आहे कारण इतका त्याच्यात गोंधळ आहे. कारण नवीन सुधारित यादीत ते कोण आहेत स्त्री का पुरुष ? त्यांचा पत्ता काय ? याचा कोणताही तपशील नाही. बरं जेंव्हा सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ मा. श्री. चोकलिंगम यांना भेटलं होतं तेंव्हा त्यांनी कुठल्याही त्रुटींशिवाय आम्ही याद्या प्रसिद्ध करू आणि तुम्ही दिलेल्या सूचनांचं पालन करू असे सांगितलं मग त्याचं काय झालं?
3) महापालिका निवडणुकांसाठी आधी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख 6 नोव्हेंबर 2025 ठरली होती आणि ती पुढे ढकलत 20 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली. मुळात तुम्ही गेले 13 महिने मतदार याद्याच प्रसिद्ध केल्या नाहीत, त्यात जी यादी जी आगामी महापालिका निवडणुकांसाठी सगळ्यात महत्वाची आहे ती प्रसिद्ध करून त्यावर हरकती घ्यायला 8 दिवस दिलेत.. हे काय आहे? मुळात तुम्ही प्रसिद्ध केलेल्या याद्या सदोष. त्यात धड कोणती माहिती नाही. बरं राजकीय कार्यकत्यांना त्यावर काम करायचं असेल तर तुम्ही ज्या याद्या प्रसिद्ध केल्यात त्या फक्त वाचण्यास योग्य. मग त्यावर काम करायचं तर त्याच्यावर काही तांत्रिक संस्कार करा त्यालाच काही दिवस लागतात. मुळात या याद्या एडिटेबल फॉरमॅट मध्ये का नाहीत? जग ‘कृत्रिम बुद्धिमत्तेकडे’ निघालेलं असताना, निवडणूक आयोगाच्या कारभारात तांत्रिक विषयांतील ‘जनरल बुद्धिमत्ता’ पण दिसत नाही. असो.
4) बरं, या याद्यांवर अभ्यास करून आक्षेप नोंदवायचे तर त्याची प्रक्रिया पण तुम्ही किचकट करून ठेवली आहेत. अनेक ठिकाणी एका वॉर्डमधले मतदार दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकलेत. अनेक इमारती तुम्ही आखून दिलेल्या नकाशाच्या आता मतदार पण पळवायला सुरुवात झाली आहे का ? पलीकडे आहेत, तरीही त्या वॉर्डमध्ये दिसत आहेत. सध्या सत्ताधारी पक्ष उमेदवार पळवत आहेत, त्यातून प्रेरणा घेऊन
5) याद्यांवर काम करून आक्षेप नोंदवताना, आक्षेप घेणाऱ्यानेच त्या मतदाराचा आधारकार्ड किंवा इतरं पुरावा मागितला आहे. हे म्हणजे चुका तुम्ही करायच्या आणि त्या आम्ही दाखवल्या की तुम्ही आमच्याकडे किंवा मतदाराकडे पुरावे मागायचे. वा ! बरं ज्या दुबार मतदारांच्या विषयासाठी आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटत होतो, आणि दुबार नाहीतच असा निवडणूक आयोग तेंव्हा करत होता. त्याच निवडणूक आयोगाने मान्य केलं की जवळपास 10 लाख दुबार मतदार आहेत. मग जर इतके मतदार दुबार आहेत त्यांना शोधून, त्यांची नावं वगळण्यासाठी 7 ते 8 दिवस कसे पुरतील? त्यासाठी किमान 21 दिवस हवेत. आक्षेप घेण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास एकत्रित आक्षेप घेण्याची मुभा असली पाहिजे.
6) एकतर निवडणूक आयोगाने 21 दिवस द्यावेत किंवा निवडणूक रद्द करावी. आणि पुन्हा सर्व याद्या सुरळीत करून निवडणुका घ्याव्यात. तुम्ही 5 डिसेंबर 2025 ला एक यादी प्रसिद्ध कराल आणि नियमाप्रमाणे आम्ही सगळं केले असं सांगून स्वतःच समाधान कराल. पण महाराष्ट्रातील जनतेला हे माहित आहे की तुम्ही अजिबात तुमच्या कामाबाबत प्रामाणिक नाही आहात. तुम्ही स्वतःला स्वायत्त यंत्रणा म्हणवता, मग तुमची स्वायत्तता दाखवाच. एक गोष्ट विसरू नका, तुम्ही पण या राज्याचे नागरिक आहात… आज कोणाच्यातरी मागे घरंगळत जाताना तुम्हाला छान वाटेल… पण ज्यांच्यामागे तुम्ही घरंगळत जात आहात, ती लोकं उद्या तुमच्या नरडीला नख लावतील तेंव्हा तुम्हाला कळेल. तुमच्यात सद्सदविवेक बुद्धी आहे असं आम्ही मानतो, तिचा मान राखा. तुमचा पाठीचा कणा ताठ ठेऊन तुमची स्वायत्तेतून येणारी शक्ती काय असते ही सत्ताधाऱ्यांना दाखवा. महाराष्ट्राची जनता तुमची शतशः ऋणी राहील.
हे सरकार निवडणूक आयोगाने बसवलेले आहे – आदित्य ठाकरे
“हे सरकार निवडणूक आयोगाने बसवलेले आहे. कुणाचा जमीन घोटाळा समोर येतोय. कुणाचे डान्सबार आहेत. लोक निवडणुकीच्या माध्यमातून राग व्यक्त करणार आहेत. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करायला बराच विलंब लावला. यादीत प्रचंड घोळ झाला आहे. जात धर्मानुसार याद्या हलवल्या गेल्या आहेत. सत्ताधाऱ्यांच्या याद्या हलवल्या नाहीत. विरोधकांच्या मात्र हलवल्या आहेत. हा देशद्रोहाचा गुन्हा आहे. माझे नाव दुसऱ्या प्रभागात हलवले हे कसे कळणार. दहापेक्षा जास्त सदस्या असणारी 26 हजार घरे आहेत. दहापेक्षा अधिक लोक असतील तर निवडणूक आयोगाने ते चेक करायला हवे. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एका घरात कसे? घर नंबर नसलेले 6 लाख मतदार आहेत. मोठ्या संख्येने दुबार मतदार आहेत,” असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



