
Fadnavis-Raj Thackeray Meeting UBT Reacts: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जवळपास 19 वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार असं चित्र तयार झालेलं असतानाच या मनोमिलनामध्ये आज ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळालं. राज आणि उद्धव एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरु असतानाच अचानक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नवा भूकंप होणार का अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. असं असतानाच या भेटीवर ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं नेमकं काय म्हटलंय पाहूयात…
राज-फडणवीस भेट
मुंबईतील वांद्रे येथील ‘हॉटेल ताज लँड एण्ड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. अर्धा तास ही भेट सुरु होती. बंद दाराआड दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समोर आलेला नाही. मात्र आज राज ठाकरे मुंबईमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याआधी ही भेट झाल्याने राज काय भूमिका घेणार याबद्दलची उत्सुकता अजून वाढली आहे. दरम्यान राज आणि फडणवीस यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्षप्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या भेटीवर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
‘झी 24 तास’शी बोलताना सुषमा अंधारेंनी, “मुलाखतीत प्रश्न विचारला गेला तेव्हा मनसे प्रमुखांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या हितापेक्षा माझा इगो मोठा नाही. मी माझा इगो बाजूला ठेवायला तयार आहे. त्यावर आम्ही साकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. आमच्या सगळ्या नेत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. यावर पक्षप्रमुख स्वत: बोलले. मात्र मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही,” असं म्हटलं आहे.
गुजरातचा उल्लेख करत टोला
पुढे बोलताना, “मुख्यमंत्र्यांनी भेटायला जावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. ते आम्हाला बांधिल नाहीत. जाताना एक नक्की आहे, महाराष्ट्राच्या हिताबद्दल बोलणार राज आता काय निर्णय घेणार आहेत? महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेणार की महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळवणाऱ्या लोकांसोबत जायचा निर्णय घेणार आहेत? चेंडू त्यांच्या कोर्टात आहे,” असं सुषमा अंधारेंनी पक्षाची भूमिका मांडताना स्पष्ट केलं.
ठाकरेंच्या युतीची चर्चा
मुंबई महानगरपालिकेबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी दोन्ही सेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली आहे. राज आणि उद्धव एकत्र आले तर त्याचा मोठा फटका मुंबईमध्ये भाजपाला बसू शकतो असा अंदाज बांधला जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.