
नाशिकमध्ये डीजेच्या आवाजाने रविवारी रात्री एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना फुलेनगरमध्ये घडल्याची नोंद पंचवटी पोलिसांत करण्यात आली आहे. नितीन फकिरा रणदिवे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुतळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डीजे सुरू झाल्यानंतर जवळच उभ्या नितीनची प्रकृती बिघडली व त्याच्या नाका-तोंडातून रक्त आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. नाशिक जिल्हा रुग्णालयात त्याचे पोस्टमार्टम सुरू आहे. गेल्या चार वर्षापासून क्षयरोगाचा उपचार होते. तसेच या तरुणाचा डीजेच्या झटक्यानं मृत्यू झाला का? तसेच लग्न, पार्टी किंवा उत्सवात अशा पद्धतीने उभे राहणे योग्य आहे का? यावर कार्डिओलॉजिस्ट काय सांगतात पाहा.
खरंच डीजेच्या आवाजामुळे मृत्यू होतो का?
डीजेचा आवाज ९० ते १०० डेसिबल असतो. १०० ते १२० डेसिबलदरम्यानच्या आवाजामुळे कानाचा पडदा फाटू शकतो, चक्कर येऊ शकते. या आवाजामुळे हृदयाचे ठोके बंद पडून ‘हार्ट अॅटॅक’ येऊ शकतो. १८० डेसिबल आवाजामुळे मृत्यूही ओढवला जाऊ शकतो. हा आवाज जितका जास्त काळ पडेल तितका धोका वाढत जातो, अशी माहिती डॉ. केशव काळे, वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट यांनी दिली आहे.
डॉक्टर सांगतात की, ध्वनी प्रदूषणामुळे आर्टियल हायपरटेंशन म्हणजेच हृदयावर ताण येणं, मायोकार्डियल इंफ्रॅक्शन म्हणजे हार्ट अॅटॅक येणं किंवा स्ट्रोक सारखे त्रास होऊ शकतात. जेव्हा डीजे किंवा इतर कोणत्याही मोठ्या साउंड सिस्टममधून मोठ्या आवाजात संगीत वाजवलं जातं. तेव्हा मानवी शरीरात असामान्य शारीरिक प्रतिक्रिया घडू शकते. ठरावीक पातळीपेक्षा अधिक डेसिबलचा आवाज मानवी शरीरासाठी घातक ठरू शकतो. याचा हृदय आणि मेंदूसारख्या अंतर्गत अवयवांवर परिणाम करू शकतो. हृदय किंवा फुफ्फुसाचे आजार असलेल्या रुग्णांनी मोठ्या आवाजाच्या ठिकाणी जसे की डीजे, साउंड सिस्टीम्स, प्रचंड गर्दीचे कार्यक्रम यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. डीजेच्या कंपनांचा ताण केवळ कानांवरच नाही, तर संपूर्ण शरीरावर होतो. काहीवेळा हे अनेकांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे विशेषतः आजारी व्यक्तींनी मोठ्या आवाजाच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.
काणठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे हृदयाचे ठोके वाढतात, हृदयाची गती वाढते. परिणामी त्याने रक्तदाब वाढतो आणि श्वासोच्छवासात अडथळा येतो. परिणामी रक्तवाहिनी फाटते, रक्ताची गुठळी निर्माण होऊन मृत्यू देखील ओढावू शकतो. एअर प्लग अथवा एअर मास्क वापरल्यास आवाजाची क्षमता कमी होते. अशावेळी आवाजाच्या क्षेत्रात कानात कापूस घालावा़ किंवा पोहण्यासाठी वापरण्यात येणारे एअर प्लगचा वापर हा या आवाजावर सर्वात चांगला उपाय आहे. स्पिकरच्या आवाजाच्या क्षेत्रात खूप वेळ थांबू नये. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, हृदयविकाराचे रुग्ण, यांनी अशा ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.