
अमरावती जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांच्या संकल्पनेतून ‘वॉल ऑफ फेम’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यासाठी २६ जानेवारीपासून हा उपक्रम राबवला जात आहे. या महिन्यात डॉ. धीरज सोळंके, वाहनचालक ज्ञानेश्वर जुनघरे आणि बांधकाम विभागाचे सुरय्या पंजाबी यांचा सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची दर महिन्याला निवड केली जाते. सीईओंच्या हस्ते या तिन्ही कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून, त्यांची छायाचित्रे ‘वॉल ऑफ फेम’वर झळकवण्यात आली आहेत. या निवडीसाठी सर्व खातेप्रमुखांकडून त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांचा मासिक कार्यमूल्यांकन अहवाल मागवला जातो. त्यातूनच उत्कृष्ट तीन कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांची छायाचित्रे ‘वॉल ऑफ फेम’वर प्रसिद्ध केली जातात. संबंधित कर्मचाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित खातेप्रमुखांच्या हस्ते गौरवही केला जातो. जानेवारी २०२६ मधील कार्यमूल्यांकनाच्या आधारे भातकुली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धीरज सोळंके, वाहन चालक ज्ञानेश्वर जुनघरे आणि बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यक सुरैय्या पंजाबी यांची निवड झाली आहे. या तिन्ही कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी अतिशय कार्यक्षमतेने पार पाडली असून, उत्कृष्ट काम केले आहे. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्कृष्ट कामासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. यामुळे प्रत्येक विभागाचे काम अधिक प्रभावी होणार असून, जिल्हा परिषद ग्रामीण भागातील नागरिकांसाठी काम करणारी यंत्रणा असल्याने अप्रत्यक्षपणे सामान्य नागरिकांनाही याचा मोठा फायदा मिळेल. या उपक्रमाचे दूरगामी सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



