
Sunny Phulmali : घरची अत्यंत बिकट परिस्थिती, डोक्यावर छप्पर नाही आणि राहायला केवळ पालावरचं घर. पण या सर्व अडचणींवर मात करत लोहगावच्या सनी फुलमाळीने आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर भारतासाठी सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे. बहरीन येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या या तरुण खेळाडूचं आता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पालकत्व स्वीकारलं आहे.
मंत्र्यांचा भावनिक निर्णय
चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वतः लोहगावमधील सनी फुलमाळी आणि त्याच्या कुटुंबाची पालावर भेट घेत त्याचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी जाहीर केलं की, सनीसाठी लोकसहभागातून घर बांधून देणार. कुस्तीच्या सरावासाठी तालीम उभारणार. तसेच शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करणार. त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या आणि पत्नीच्या उत्पन्नातून दरमहा 50 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली.
‘जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर सनीने मिळवलेलं यश कौतुकास्पद आहे. डोक्यावर छप्पर नसतानाही पालावर राहून सुवर्ण कामगिरी करणं म्हणजे खरंच प्रेरणादायी उदाहरण आहे. आता आम्ही त्याचं शिक्षण, सराव आणि घर या सर्व गोष्टींसाठी खंबीरपणे पाठबळ देऊ असं चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
कुस्तीच्या विश्वातील नवा तारा
सनी फुलमाळीचा हा विजय फक्त क्रीडा क्षेत्रातला नाही तर समाजातील वंचित घटकांसाठी प्रेरणा देणारा आहे. सनीच्या प्रशिक्षक वस्ताद सदाशिव राखपसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सनीने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. कार्यक्रमाला भाजपा क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे, माजी नगरसेवक बॅाबी टिंगरे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश संघटनेचे स्वामी धनगर, शरद माकर, किशोर शिंदे, अरविंद देवकर यांनी सनीच्या परिस्थितीकडे सरकारचं लक्ष वेधलं. त्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी संघटनेचे आभार मानले आणि आगामी काळात अशा खेळाडूंना सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलं.
शासकीय नोकरीचा मार्ग खुलेल
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यातील 17 वर्षांवरील आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात घेण्यात आला होता. मात्र, आता सनीच्या निमित्ताने 17 वर्षाखालील खेळाडूंनाही ही संधी मिळावी यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे.
सनीच्या घरावर आजही टीनचं छप्पर असलं तरी आता त्याच्या आयुष्यात नव्या आशांचा किरण उजळला आहे. जिद्दीच्या बळावर सुवर्ण कमावणाऱ्या या तरुण खेळाडूच्या कहाणीने महाराष्ट्रभरातील अनेकांना प्रेरणा दिली आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
FAQ
1. सनी फुलमाळी कोण आहे?
सनी फुलमाळी हा पुणे जिल्ह्यातील लोहगाव परिसरात राहणारा तरुण कुस्तीपटू आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत पालावर राहून त्याने बहरीन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे.
2. सनी फुलमाळीने कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं?
सनीने बहरीन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games) मध्ये कुस्ती या क्रीडा प्रकारात भारतासाठी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.
3. सनीच्या घरची परिस्थिती कशी आहे?
सनी आणि त्याचं कुटुंब लोहगावमधील पालावर राहतात. डोक्यावर टीनचं छप्पर असून आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तरीही सनीने आपल्या जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



