
वाळूजच्या औद्योगिक नगरीमधून नशेखोरीसाठी वापरले जाणारे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. एनडीपीएस पथक व एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये १ किलो ४७३ ग्रॅम वजनाचे ड्रग्ज जप्त केले. त्याचे बाजारमूल्य १ कोटी २३ लाख ६५ हजार आहे. व
.
या प्रकरणात भंगाराच्या गोदामाचा मालक बबन खान (रा. साजापूर), आयशर चालक शफीकुर रहमान तफज्जुल हुसेन (४५), राज रामतिरथ अजुरे (३८, दोघे रा. उत्तर प्रदेश, ह.मु. साजापूर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती एनडीपीएस पथकाच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.
वाळूजमधील मायलन कंपनीतून बाहेर पडणाऱ्या दोन ट्रकमधून एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक पावडरची तस्करी केली जात होती. शनिवारी (२१ जून) पथकाने छापा टाकत ट्रक (एमएच ०४ बीयू ५१६० व एमएच ०४ ईवाय ९९७७) यातून निळ्या रंगाचे बॅरल व त्यात पावडरने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या. त्यांचे वजन १ किलो ५१२ ग्रॅम होते,असे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी त्यानंतर न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. पोलिस आणि वैज्ञानिक प्रयोगशाळेचे सहायक रासायनिक विश्लेषक विनोदकुमार शहागडकर, प्रयोगशाळेचे परिचर प्रशांत कवडे यांनी आयशरमधील पथकाने बबन खानच्या साजापूूर येथील गोदामावर छापा मारला. तेथेही कंपनीमधील स्क्रॅपचा मोठा साठा होता. त्यात ९६१ ग्रॅम पावडर आढळली. या पावडरची प्राथमिक तपासणी केल्यावर एमडी ड्रग्ज असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यरात्री ५ किमीची टेहळणी करून पहाटे ट्रक जायचे
कंपनीच्या आतून कच्चा माल बाहेर आणण्यासाठी मध्यरात्रीपासून तयारी सुरू असते. खानचा मुलगा आजूबाजूच्या तब्बल ५ किमी परिसराची संपूर्ण टेहाळणी करतो. त्याच्यासोबत काही कामगारदेखील असतात. त्याच वेळी काही मंडळी दुचाकीवरून टप्प्याटप्प्यावर थांबलेली असतात. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास ट्रक कंपनीतून बाहेर काढले जातात. या दोन्ही ट्रकचे रांजणगाव येथील दत्तनगर फाट्यावरील वजन काट्यावर वजन केले जाते. वजन झाल्यावर पुन्हा कंपनीसमोर येऊन दोन्ही ट्रक साजापूर शिवारातील भंगाराच्या गोदामाकडे रवाना होतात. गोदामात अगोदरच मुंबई येथून आलेली एक कार उभी असते. अवघ्या काही मिनिटांत ही कार काही ग्रॅम ड्रग्ज घेऊन मुंबईकडे रवाना होते. खान याच्याकडे केवळ भंगार उचलण्याची जबाबदारी आहे. मात्र, तो त्यातील रासायनिक पावडरदेखील उचलून घेतो.
मुळात औषध निर्माण कंपनीने यासाठी अधिकृत एजन्सी नेमणे बंधनकारक असते. मात्र, हे नियम धाब्यावर बसवल्याने खान याने त्यातूनच ड्रग्जचे रॅकेट उभे केले होते. त्यातून त्याने कोट्यवधींची माया जमवली आहे. या भंगार गोदाम चालकांना पंढरपूर भागातील काही राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याचीही वाळूज परिसरात चर्चा आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.