
तेलंगणाचा रंगारेड्डी जिल्हा. जमिनींचे माहेरघर. येथील कोकापेट, नरसिंगी, मेकागुडा, शमशाबाद यांसारख्या ग्रामीण भागांत एकेकाळी भात आणि कापसाची पिके डोलत होती. सुमारे ४-५ वर्षांपूर्वीपर्यंत या जमिनीचा भाव १ ते ३ कोटी रुपये प्रति एकर होता, पण या जमिनी आता राज्याची डिजिटल इकॉनॉमी बनल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची साक्ष देणारी कोकापेटमधील जमीन आता १३७ ते १५१ कोटी रुपये प्रति एकर दराने विकली जात आहे. शमशाबाद कॉरिडोअरमध्ये जमिनीच्या किमती २५ कोटी रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. नरसिंगीमधील प्रमुख ठिकाणी जमिनीचे दर ३० ते ७० कोटी रुपये प्रति एकरपर्यंत पोहोचले आहेत. हे डेटा सेंटर्स उभारल्यामुळे शक्य झाले आहे. आज या गावांमध्ये विशाल डेटा सेंटर्स, सर्व्हर फार्म आणि काचेच्या चकचकीत इमारती उभ्या राहत आहेत. रंगारेड्डी जिल्हा मुंबईनंतर देशातील दुसरे सर्वात मोठे केंद्र बनणार आहे. मायक्रोसॉफ्ट या वर्षी आपले इंडिया साऊथ सेंट्रल क्लाउड रीजन येथेच सुरू करणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या, त्यांच्याकडे आता ना शेती उरली आहे ना कोणताही व्यवसाय किंवा कामधंदा. चंदनवल्ली गावचे ५२ वर्षीय शेतकरी मल्लेशम गौड सांगतात की, मी ३ एकर जमीन विकली होती. त्या पैशातून पक्के घर बांधले. मुलांचे लग्न केले. पण, आता आमच्याकडे उपजीविकेचे कोणतेही साधन नाही. कॉम्प्युटर आणि सर्व्हर चालवता आम्हाला येत नाही, नाही तर इथेच नोकरी मिळाली असती. मेकागुडाच्या माजी सरपंच के. लक्ष्म्मा सांगतात की, सरकारने जमिनी तर घेतल्या, पण आमच्या तरुणांना फक्त सिक्युरिटी गार्डचे काम मिळाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
