
Sanjay Raut on Devendra Fadnavis: मनसे अध्यक्ष राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या मागे ठामपणे उभे आहेत. कबरी उखडण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या लोकांचं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जी बिनडोक लोक आहेत त्यांची ही भूमिका आहे. वातावरण त्यांनी खराब केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. ते मूकपणे पडद्यामागून या सगळ्याला उत्तेजन देता राहिले. फडणवीसांनी चांगलं काम केलं तर पाठिंबा देऊ म्हणताना चांगल्या कामांची यादी जाहीर करायला हवी होती असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
“त्यांना (राज ठाकरे) कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा आहे. कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला आणि गुन्हेगारांना पाठीशी घातलं हे चांगलं काम आहे का? मुंबईत मराठी माणसाची पिछेहाट सुरु आहे, महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काहीच बोलत नाही, हे चांगलं काम आहे का? मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जात आहे, मराठी संस्कृतीवर हल्ला केला जात आहे. हे चांगलं काम असेल तर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं राष्ट्राची गरज आहे,” असंही ते म्हणाले आहेत.
“औरंगजेब आणि त्याच्या कबरीसंदर्भात आम्ही नेहमीच अशी भूमिका घेतली आहे की, ते महाराष्ट्रातील, मराठा योद्ध्यांच्या, शिवाजी महाराजांसाठी प्राणाची आहुती दिली त्या सर्वांच्या शौर्याचं प्रतीक आहे आणि ते राहिलं पाहिजे. लोकसभेत त्यांची भूमिका वेगळी होती. ती भाजपाच्या सोयीची होती,” असा आरोप त्यांनी केला.
“मराठी माणसासंदर्भात कानफडात आवाज काढायला पाहिजे. कोणत्या पक्षाचा नेता ही भूमिका मांडत आहे यासंदर्भात संशय असण्याचं कारण नाही. बाळासाहेबांनी ज्या शिवसेनेची स्थापना केली, ज्याप्रकारे मराठी माणसाचं संघटना भाजपाने तोडलं, उद्धवस्त केलं हा मराठी माणसाच्या एकजुटीवर सर्वात मोठा हल्ला केला. जर राज ठाकरेंनी मनावर घेऊन कोणाच्या कानफटात मारण्याचं ठरवलं असेल तर त्यांचं स्वागत आहे,” अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे.
पुढे ते म्हणाले, “पण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा हात आहे. ही शिवसेना बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी स्थापन केली. तिची शकलं करुन मुंबईवर व्यापारांचा ताबा राहावा यासाठी जे राजकारण झालं, त्यामागे जे आहेत त्यांना ते पाठिंबा देत आहेत. आम्ही मराठी माणसाच्या पुनर्वसन आणि प्रगतीसाठी काम करत आहोत. अशावेळी शत्रूंना मदत होईल अशी अशी भूमिका कोणी घेऊ नये”.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.