
UBT Slams BJP As Sunetra Pawar Takes Deputy CM Oath: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यावरुन टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीच या राजकीय खेळीमागे असल्याचा दावा ‘सामना’च्या अग्रलेखातून करताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं राजकीय भविष्य काय असेल याबद्दलही ठाकरेंच्या शिवसेनेनं भाकित केलं आहे.
पटेल-तटकरे हे स्वतः निवडून येण्याची मारामार
“भविष्यात शिंदे व अजित पवार यांच्या पक्षांचे काय होईल ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. पुढील लोकसभा निवडणुकीला अजून वेळ आहे, पण 2029 ची विधानसभा भाजप ‘शत प्रतिशत’ स्वबळावर लढणार, हे निश्चित आहे. त्याआधी शिंदे गट व अजित पवारांच्या पक्षातील अनेक आमदार भाजपमध्ये जातील. त्या वेळीच सुनेत्रा पवार यांची खरी कसोटी लागेल. पटेल-तटकरे हे स्वतः निवडून येण्याची मारामार, तेथे पक्षाचे आमदार ते निवडून कसे आणणार? त्यामुळे शिंदे व सुनेत्रा पवारांचे पक्ष पूर्णपणे फडणवीस यांच्या मेहेरबानीवरच अस्तित्व टिकवू शकतील,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
सुनेत्रा पवारांचे उपमुख्यमंत्रीपद म्हणजे शोभेचे ठरू नये
“सुनेत्रा पवारांचे उपमुख्यमंत्रीपद म्हणजे शोभेचे ठरू नये. अजित पवारांचे कर्तृत्व, कष्ट करण्याची क्षमता, अफाट लोकसंग्रह व भाजपसमोर फार न झुकण्याची किमया त्या दाखवू शकल्या तर त्यांचे स्वतंत्र स्थान निर्माण होऊ शकेल. उपमुख्यमंत्रीपदास संवैधानिक मान्यता नाही, पण त्यांच्याकडे असलेल्या खात्यांना महत्त्व असते. अजित पवारांकडे असलेले अर्थ, नियोजन खाते महत्त्वाचे होते व त्यामुळे आमदार, कार्यकर्त्यांना सढळ हस्ते निधी वाटप होत असे. निवडणुकांतही अजित पवारांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला. आमदार-कार्यकर्त्यांची बरी-वाईट कामे केली. सुनेत्रा पवार हे कसे हाताळतात, ते पाहावे लागेल. खिडकी उघडली की, हवेबरोबर विषारी कीटकही आत येतात याचाही अनुभव सुनेत्रा पवार घेतील,” असं ‘सामना’मध्ये म्हटलं आहे.
शहा व फडणवीस यांचाच ‘अजेंडा’
“कदाचित सुनेत्रा पवार ‘गुंगी गुडिया’ न बनता प्रभावीपणे काम करतील. तेव्हा पटेल, तटकरे, भुजबळांची अडचण होईल. सुनेत्रा पवार म्हणजे अजित पवार नाहीत. अजित पवारांना शरद पवार यांच्याविषयी आदर व ओलावा होता. त्यातूनच दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा व प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर त्याबाबत अंतिम निर्णय होण्याचे ठरले, पण अजित पवारच निघून गेले. पटेल-तटकरे यांना विलीनीकरण नको आहे. हा अमित शहा व फडणवीस यांचाच ‘अजेंडा’ आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ
“अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबात व राज्याच्या घडामोडीत गुंता वाढला. गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ आहे. पुढचे पुढे पाहू. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या. त्यांचे अभिनंदन! सुतक काय, येते आणि जाते. राजकारण थांबवून कसे चालेल? राजकारण खरोखरच लई वंगाळ झाले आहे,” असा टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



